सुप्रिया सुळे यांची कार्यकर्त्यांना विनंती; पाडव्याला गोविंदबागेत न येता डिजिटल शुभेच्छा द्या !

Supriya Sule

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपरिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना गोविंदबागेत न येता यंदाच्या वर्षी भेटीगाठी, दिवाळी डिजिटल पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट :

आपण सर्वजण दिवाळीचा सण साजरा करतोय. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आदरणीय पवारसाहेब आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीला आवर्जून येतात. गेल्या काही दशकांपासून पवार कुटुंबीय आणि जनतेतील नात्याचे हे स्नेहबंध अधिक घट्ट करणारा हा शिरस्ता कायम आहे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आम्हाला लाभतात. अर्थात हेच तर आम्हा सर्वांचं बळ आहे, जे आम्हाला वर्षभर पुरतं. पण या वर्षीचा सण हा नेहमीसारखा नाही. दिवाळीचा आनंद साजरा करताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर काही मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मर्यादांचे भान सर्वांनाच राखावे लागणार आहे.

यामुळेच मनावर दगड ठेवून, नेहमीचा शिरस्ता मोडत आम्ही पवार कुटुंबीयांनी या दिवाळीत कोणालाही भेटायचं नाही, असं  ठरविलं आहे. आम्हा सर्वांना तुमची आपुलकी, प्रेम, स्नेह व आशीर्वाद यांची उणीव भासेल, याची आम्हाला जाणीव आहे; पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भेटीगाठीचा दरवर्षीचा हा शिरस्ता मोडणं भाग आहे. आपण हे समजून घ्याल असा आम्हाला विश्वास आहे. यापूर्वीही पवार कुटुंबीयांच्यावतीने याबाबतचे निवेदन प्रकाशित करण्यात आले होते. जर नजरचुकीने कोणाच्या वाचण्यात ते निवेदन आले नसेल, तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, यंदाच्या दिवाळीत कृपया कोणीही भेटीसाठी बारामतीला येऊ नये.

कोरोनाचे संकट टळल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने हा दिवाळीचा उत्सव साजरा करू. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी आणणारी असो ही सदिच्छा…असे सुळे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER