ईडीचा पायगुण चांगला; आता शिवसेनेलाही मोठं काही तरी मिळणार – सुप्रिया सुळे

Supriya Sule

पुणे :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ईडीकडून मिळालेल्या नोटीसीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) ईडीकडून नोटीस मिळाली. त्यानंतर राज्यातील सत्तेचं चित्रं बदललं. आता शिवसेनेनेला नोटीस आली आहे. त्यांच्याकडे आधीच मुख्यमंत्रीपद आहे. बहुतेक शिवसेनेला मोठं काही तरी मिळणार असं वाटत आहे. ईडीचा पायगुण चांगला आहे. येऊ द्या नोटीसा, असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला लगावला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या मावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीवरून भाजपला धारेवर धरले.

यावेळी त्या म्हणाल्या की, शरद पवारांना या आधी ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आता सेनेकडे ईडीची नोटीस आली आहे. आधीच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय. आता शिवसेनेला आणखी काही मोठं मिळणार असं दिसतंय. ईडीचा पायगुण चांगला आहे. येऊ द्या नोटीसा. सगळं चांगलं घडेल, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी पवारांच्या पावसातील सभेचाही आवर्जुन उल्लेख केला.

आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आमचं सरकार आल्यावर अनेक दावे केले गेले. भविष्यवाणी केली गेली. सुरुवातीला सांगितलं हे सरकार सात दिवस टिकेल. त्यानंतर सात महिने टिकेल असं सांगितलं गेलं. आता तर एक वर्ष झालं आहे. आता पुढची पाच वर्षेच काय २५ वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी त्यांनी कोरोना (Corona) लसीवरही भाष्य केले. एक लाख कोटींच्यावर चर्चा मारणारे आज पुण्यात आहेत. ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’, असा पंतप्रधान मोदींना चिमटा काढतानाच शेवटी पुण्यातच लस तयार होतेय. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे. पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं तर गैरसमज नसावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला गृहमंत्र्यांचे प्रतिउत्तर 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER