पक्षाच्या उभारणीसाठी आता सुप्रिया सुळे मैदानात, महाराष्ट्रातील जनतेशी साधणार संवाद

Supriya Sule

मुंबई : राज्यात अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजानादेश यात्रा काढली आहे. तर भाजप बरोबर युतीत असलेल्या शिवसेनेने देखील पक्ष मजबुतीसाठी जन आशीर्वाद काढली आहे. दुसरीकडे गळती लागलेल्या राष्ट्रवादी पक्षाने देखील पक्ष मजबुतीसाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे देखील संवाद दौरा काढून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ह्यात सहा जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत. राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सरकारचा ढिसाळ कारभार या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा दौरा असल्याची माहिती आहे.संवाद दौऱ्याचा पहिल्या टप्प्यात २३ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागलेली असून, पक्षातील अनेकमातब्बर नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पक्षाला उभारण्यासाठी खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. तर आता खा. सुप्रिया सुळे देखील संवाद दौरा काढून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे.