सुप्रीम कोर्टाचे आभार! आता तरी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा : सुप्रिया सुळे

मुंबई : केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवर आणि शेतकरी आंदोलनावरच्या सुप्रीम कोर्टातल्या (supreme-court) सुनावणी दरम्यान कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करून कोर्टाचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागतोय. परंतु त्यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही किंबहुना त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आता तरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देताना या कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. सरकारने आता तरी संवेदनशील व्हायला हवं. चर्चेची मागणी करूनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारला संधी आहे. सरकारने सर्वांशी चर्चा करावी. शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, असं आवाहन सुळे यांनी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER