निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी ही गुन्हेगारांना सणसणीत चपराक: खासदार सुप्रिया सुळे

Supriya Sule on -hanging-of-nirbhaya-rape-and-murder-case-convicts

मुंबई: निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना फाशी देण्यात आली असून त्यामुळे कायद्याचा सन्मान राखला गेला आहे. या आरोपींना देण्यात आलेली फाशी ही असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

निर्भया प्रकरणातील चार दोषींना आज फाशीची शिक्षा देण्यात आली. यासाठी सकाळपासूनच तयारी करण्यात आली होती. दोषींच्या फाशीपूर्वी तुरूंगाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसंच फाशीची बातमी समजताच तुरूंगाबाहेर जमलेल्यांनी जल्लोष केल्याचं पहायला मिळालं. तब्बल ७ वर्ष ३ महिन्यांनंतर आज निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर लटकले. कायद्याचा सन्मान राखला गेला. येथे कायद्याचे राज्य आहे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा संदेश देणारी ही घटना आहे. या आरोपींची फाशी असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे. निर्भयाला श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान अशा विकृतींसोबत असंच झालं पाहिजे. आपण सुटू शकत नाही ही आरोपींना जरब बसेल. त्यामुळे या घटनेचे मी स्वागतच करते, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवकत्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली.

निर्भया प्रकरण ; अखेर ‘न्याय’ मिळाला : नवनीत राणा