
मुंबई : भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणं सोपं नाही असंही ते म्हणाले आहेत. कांत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. हे अतिशय बेजबाबदार विधान असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सुळे म्हणाल्या.
दरम्यान भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण आहे. देशाला स्पर्धात्मक करण्यासाठी आणखी सुधारणांची आवश्यकता आहे, परंतु भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं अवघड जातं. अशा सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. त्या करण्याची इच्छाशक्ती या सरकारने दर्शवली आहे, असे कांत यांनी सांगितले . केंद्र सरकार सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा करीत असल्याचे कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, खणिकर्म, कोळसा, कामगार, कृषीसह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत, परंतु त्या राबवणे कठीण जात आहे , असे अमिताभ कांत म्हणाले होते .
भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध.भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.https://t.co/B4SM2VJi2K
— Supriya Sule (@supriya_sule) December 9, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला