‘महाराष्ट्राला हे मान्य नाही’, सुप्रिया सुळेंचे संसदेत स्पष्टीकरण

मुंबई : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर केली. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयकं मांडली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली. यावेळी चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही असं स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लोकसभेतील आपल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, लोकसभेत जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी या विधेयकाच्या अनुषंगाने असलेले आक्षेप सभागृहात मांडले. या विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही. या विधेयकाच्या संदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांची संमती घेतली आणि मुख्यमंत्री या प्रारुपास संमत आहेत असा उल्लेख केला आहे. परंतु जेव्हा मी तपासणी केली तेव्हा ही संमती यापुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली होती. महाराष्ट्र याला सहमत नाही.

तसेच केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरीत मजूरांची नोंद आपल्याकडे नाही त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे कळविले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे. सुरुवातीला कोरोनाचं गांभीर्य न ओळखून नंतर मात्र कसलंही नियोजन न करता अतिशय घाईघाईने केंद्र सरकारने लॉकडाऊन केलं. अनेक गरीब मजूरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पाडलं. अनेकांनी रस्त्यातच प्राण सोडले.

गोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का? रेल्वे रुळावर हातात भाकरी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का? वडिलांच्या खांद्यावर भुकेने व्याकूळ होऊन मरण पावलेल्या लेकरांचा टाहो ऐकायला आला नाही का? ही असंवेदनशीलता भयावह आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER