पवार कुटुंब एकसंघच; सुप्रिया सुळेंनी शेअर केला फोटो

Pawar Family

मुंबई : २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर पवार कुटुंबीयांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पवार कुटुंबप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रतिभाताई पवार यांनी ती परिस्थिती सामंजस्याने हाताळत अजित पवार यांना फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्यास भाग पडले. मात्र त्यानंतरही अजित पवार आणि शरद पवारांमध्ये आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. परंतु आता शरद पवार आणि अजित पवार पूर्वीसारखे एकत्र आलेले असून, पवार कुटुंबीय आताही एकसंघ असल्याचा पुरावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला.

डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून राज्य आणि देशातील मोठमोठे राजकीय पेच सोडवणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा डिनर घेतानाचा आणखी एक फोटो सुळे यांनी व्हायरल केला आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत डिनर घेतानाचा हा फोटो नाही तर हा फोटो नसून हा पवार कुटुंबीयांचा डिनरचा फोटो आहे. दिवाळी असो की पाडवा किंवा इतर कोणतेही सण-उत्सव वा समारंभ असो पवार कुटुंबीय प्रत्येक क्षण एकत्र येऊन आनंदात साजरा करतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी आणि गाण्याची मैफलही रंगते. त्यातून कुटुंबातील सुसंवाद चांगला राहतो. तसेच या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबाला एकत्र भेटण्याचा योगही मिळतो.

सुप्रिया सुळे यांनी आता पवार कुटुंबाचा डिनर घेतानाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वत: शरद पवार, प्रतिभाताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे आणि पार्थ पवारांसह शरद पवार यांचे इतर नातवंडे दिसत आहेत. डिनर सुरू होण्यापूर्वी डायनिंग टेबलवरचा हा फोटो आहे. या फोटोत कुटुंबातील एकूण १२ जण दिसत असून सर्वच जण कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. पवार कुटुंबाच्या एकूण तीन पिढ्यांचा हा फोटो आहे. फोटो काढताना हास्यविनोद झाल्याचं या फोटोतील सर्वांच्या चेहऱ्यावरून हसण्यातून दिसत आहे.

सुप्रिया सुळे या नेहमीच कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. खासकरून एकत्रित कुटुंबाचा फोटो त्या आवर्जून शेअर करतात. तसेच सण-उत्सावातील कौटुंबिक प्रसंगही त्या शेअर करतात. त्यातून राजकीय संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याच्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दरम्यान पक्षावरील पकडीवरून वाद असल्याच्या आणि हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असून एकमेकांचे स्पर्धक असल्याच्या वावड्या नेहमीच उठवल्या जातात. त्यातून पवार कुटुंबात काहीच आलबेल नसल्याचं दाखवण्याचा प्रकारही मीडियातून होत असतो. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीय एकसंघ आणि एका विचारानं एकत्रित असल्याचा मेसेज देण्यासाठीच सुप्रिया यांच्याकडून कुटुंबाचे फोटो व्हायरल केले जात असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER