हिंगणघाट जळीतप्रकरण : पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

Hinganghat Burn Case - Supriya Sule

नागपूर : हिंगणघाट पीडितेने आज अखेर आपल्यातून निरोप घेतला आहे. अत्यंत दुःखद या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. गेल्या सात दिवसांत डाक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, कालची रात्र पीडितेसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरली आणि आज पहाटे अखेर तिने श्वास सोडला. या दुःखद घटनेनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

हिंगणघाट जळीतकांड : अखेर तिने आज आपल्यातून निरोप घेतला

ही अतिशय दुर्दैवी घटना आज सकाळी झालेली आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी घटना आहे. हा मृत्यू नसून खून झालेला आहे, असं मला आता वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या. कुठलीही व्यक्ती असल्यास तिच्याविरोधात अशी घटना घडल्यास तिला तातडीनं न्याय मिळेल, असा मेसेज राज्यात गेला पाहिजे. कायद्याचा धाक बसणं अतिशय गरजेचं आहे. तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचारही करू शकत नाही. ते कोणत्या भयानक परिस्थितीतून जात असतील. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.