महाराष्ट्र विधानसभा सचिवांना  सुप्रीम कोर्टाची ‘कन्टेम्प्ट’ नोटीस

अर्णव गोस्वामींना अटक करण्यासही मनाई

Supreme Court & SC

नवी दिल्ली : ‘रिपब्लिक टीव्ही’या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र विधानसभेने त्यांच्याविरुद्ध प्रस्तावित केलेल्या हक्कभंग (Breach Of Privilage) कारवाईविरुद्ध केलेली याचिका  प्रलंबित असताना विधानसभेच्या सचिवांनी गोस्वामी यांना पाठविलेल्या पत्रास गंभीर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा सचिवांविरुद्ध न्यायालयीन अवमाननेची (Cntempt of Court) कारवाई करण्याची नोटीस शुक्रवारी जारी केली.

न्यायालयाने एखाद्या विधिमंडळाच्या सचिवांविरुद्ध अशा कारवाई करण्याची देशातील ही बहुधा पहिलीच घटना आहे. या हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांना अटक करण्यास मनाई करणारा अंतरिम आदेशही न्यायालयाने दिला. विधानसभेची हक्कभंग समिती व विधानसभा अध्यक्ष यांच्यात झालेला पत्रव्यवहार गोस्वामी यांनी याचिकेवरील सुनीवणीच्या गेल्या तारखेला न्यायालयापुढे सादर केला होता. विधानसभा सचिवांनी १३ आॅक्टोबर रोजी  गोस्वामी यांना पत्र पाठवून यास आक्षेप घेतला व याने तुम्ही आणखी अडचणीत याल, अशी तंबी गोस्वामी यंना दिली.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठापुढे याचिका शुक्रवारी पुढील सुनावणीसाठी आली तेव्हा गोस्वामी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी विधानसभा सचिवांनी पाठविलेल्या या पत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ते वाचून सरन्यायाधीश न्या. बोबडे संतापले. आमच्यापुढे प्रकरण सुनावणीला असताना हे सचिव असे पत्र पाठविण्याचे धाष्टर्य करूच कसे शकतात, असा सवाल करून न्या. बोबडे म्हणाले की, हा आमच्या अधिकारांत सरळसरळ हस्तक्षेप आहे व न्याय मागण्यासाठी न्यायालयात येणार्‍या  नागरिकाला धमकावण्याचा हा प्रकार आहे.

गोस्वामी यांच्या याचिकेची नोटीस ५ ऑक्टोबर रोजी बजावूनहीविधानसभा व विधानसभा अध्यक्षांतर्फे कोणीही हजर नव्हते. महाराष्ट्र सराकरच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी हजर होते. पण या पत्राच्या संदर्भात त्यांनी न्यायालयास एवढेच सांगितले की, मी यावर काही बोलणे हे मला नेमून दिलेल्या  कामाहून अधिक बोलणे होईल. (I Will be eceeding my breief) साळवे यांच्या विनंतीवरून खंडपीठाने सचिवांच्या या पत्राची स्वत:हून (Suo Moto) स्वतंत्रपणे दखल घेतली व विधानसभा सचिवांना, तुमच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई का करू नये, याचा खुलासा मागणारी नोटीस काढली. सचिवांनी या नोटिशीला दोन आठवड्यांत उत्तर द्यायचे आहे. या ‘कन्टेम्प्ट’ प्रकरणात ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांना ‘न्यायालयाचा मित्र’ ( Amicus curiae) म्हणून मदत करण्यास सांगण्यात आले.

गोस्वामी यांना बुधवारी रायगड पोलिसांनी केलेली अटक, लगेच मुंबईत त्यांच्याविरुद्ध  नोंदविला गेलेला नवा गुन्हा याचा संदर्भ देत साळवे म्हणाले की, गोस्वामी मोकळे राहू नयेत यासाठी त्यांच्यावर एका पाठोपाठ केस दाखल केल्या जात आहेत. रायगडच्या केसमध्ये जामीन मिळाल्यावर त्यांना या हक्कभंंगाच्या केसमध्ये अटक केली जाऊ शाकेल. तेव्हा या अटकेला स्थगिती द्यावी, असा आग्रह साळवे यांनी धरला. तो मान्य करून खंडपीठाने अटकेला अंतरिम स्थगिती दिली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या संदर्भात राज्य सरकारने दाखविलेल्या नाकर्तेपणाबद्दल  ‘रिपब्लिक टीव्ही’वरून सादर झालेल्या एका कार्यक्रमात गोस्वामी यांनी मुख्यमंत्री शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या काही कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत तर मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत हक्कभंगाची नोटीस दिली. त्यावरून गोस्वामी यांना हक्कभंगाची ६० पानांची नोटीस पाठवून सभागृहासमोर हजर होण्यास सांगण्यात आले. याविरुद्ध गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

हा तर हस्तक्षेप व धमकी

विधानसभा सचिवांना नोटीस काढण्याच्या आदेशात खंडपीठाने नमूद केले की, गोस्वामी यांनी विधानसभेचा पत्रव्यवहार न्यायालयात सादर करणे हा गोपनीयनेचा भंग व सभागृहाचा अवमान आहे, असे विधानसभा सचिव १३ ऑक्टोबर रोजी गोस्वामी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात. हे पत्र म्हणजे न्याय प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करणे आहे. न्यायालयात दाद मागितली म्हणून  गोस्वामी यांना धमकावणे व त्यांना धडा शिकविणे हा हे पत्र लिहण्यामागचा हेतू असावा, असे दिसते.

खंडपीठाने पुढे म्हटले की, मुलभूत हक्कांवर घाला घातला जात असेल तर राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२ अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे हा नागरिकाचा मुलभूत हक्क आहे, हे सचिवांनी लक्षात घेतले असते तर अधिक चांगले झाले असते. नागरिकाला धमकावून त्याचा हक्क बजावण्या पासून परावृत्त करण्यासाठी धाकदपटशा करणे हा न्याय प्रक्रियेत गंभीर स्वरुपाचा हस्तक्षेप आहे, असे आम्हाला प्रथमदर्शनी वाटते.

अजित गोगटे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER