‘आयएनएस विराट’चे संग्रहालय होण्याची शक्यता अखेर संपुष्टात जतन करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली: ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलेली ‘आयएनएस विराट’ (INS Virat) ही भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका भंगारात काढली जाऊ नये यासाठी करण्यात आलेली विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition- SLP)  फेटाळल्याने या युद्धनौकेचे संग्रहालय म्हणून जतन होण्याची शक्यता अखेर संपुष्टात आली आहे.

ही युद्धनौका भंगारात न काढता संग्रहालय म्हणून जतन करण्यासाठी आमच्याकडे सुपूर्द करावी, अशी ‘एसएलपी’ मे. ए्न्व्हीटेक मरीन कन्सल्टंन्ट्स प्रा. लि. या कंपनीने केली होती. परंतु ‘आयएनएस विराट’चे गुजरातमधील अलंग येथील जहाज तोडणी आवारात ४० टक्के तोडकाम करण्यात आल्याने आता आम्ही काहीही करू शकत नाही, असे म्हणत सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली.

कोर्टात हजर असलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीला सरन्यायाधीश म्हणाले की, या युद्धनौकेचे संग्रहालय म्हणून जतन करण्यामागच्या तुमच्या राष्ट्रप्रेमाच्या बावनेची आम्ही कदर करतो. पण तुम्ही खूपच विलंबाने कोर्टात आला आहात. ती युद्धनौका ४० टक्के तोडून झाली आहे. शिवाय तुमचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयानेही अमान्य केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालय तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही.

नौदलाने ‘आयएनएस विराट’ला सन २०१७ मध्ये सेवेतून निवृत्त केले. त्यानंतर ही युद्धनौका भंगारात विकत घेण्यासाठी खुल्या बोली मागविल्या. त्यात अलंग येथील श्रीराम शिप ब्रेकर्स या कंपनीने ६५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली देऊन ती विकत घेतली. हे झाल्यानंतर मे. एनव्हीटेक कंपनीने श्रीराम कंपनीकडून ही युद्धनौका १०० कोटी रुपयांना विकत घेऊन तिचे संग्रहालय म्हणुून जतन करण्याचा प्रस्ताव दिला.

सुरुवातीस एन्व्हीटेक कंपनीने यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. कंपनीने आपल्या प्रस्तावाचे निवेदन संरक्षण मंत्रालयाकडे पाठवावेव व मंत्रालयाने त्यावर निर्णय घ्यावा, असे सांगून न्यायालयाने ती याचिका निकाली काढली होती. संरक्षण मंत्रालयाने नकार दिल्यावर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली. १० फेब्रुवारी रोजी या याचिकेवर नोटीस काढताना ‘आयएनएस विराट’च्या तोडकामास अंतरिम स्थगिती दिली होती. आता याचिकाच फेटाळल्याने ही स्थथगितीही राहणार नाही व तोडकाम पूर्ण होऊन ‘आयएनएस विराट’ कायमची नष्ट होईल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button