बायडेन यांच्या निवडीविरुद्धचा दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळला; हताश ट्रम्प यांचा अखेरचा प्रयत्नही निष्फळ

us supreme court

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे विजयी उमेदवार ज्यो बायडेन यांची निवड रद्द करण्यासाठी टेक्सास राज्याने केलेला दावा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (us supreme court) फेटाळला. जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्वेनिया व विस्कॉन्सिन या चार राज्यांत कोरोना महामारीमुळे बहुसंख्य मतदान टपाली मतदानाने झाले होते. त्यात मोठा घोटाळा झाला असल्याने ते मतदान रद्द करावे यासाठी टेक्सास राज्याने  हा दावा  दाखल केला होता. परंतु इतर राज्यांनी मतदान कसे घ्यावे याच्याशी टेक्सासचा काही संबंध नाही.

त्यामुळे ते राज्य मुळात असा दावा करूच शकत नाही, असे म्हणून दावा तडकाफडकी फेटाळण्याचा बहुमताचा त्रोटक आदेश दिला गेला. मात्र न्या. सॅम्युअल ए. अलितो ज्यू. व क्लेरेन्स थॉमस या दोन ट्रम्प समर्थक न्यायाधीशांनी थोडीशी असहमती दर्शविली. त्यांचे मत टेक्सास दावा दाखल करू शकते; परंतु  त्यातील मागणी मान्य करण्यासारखी नाही, असे होते. परंतु या असहमतीने अंतिम निकालात काहीच फरक पडला नाही. टेक्सास राज्याने हा दावा पराभूत उमेदवार व मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून केला होता हे उघड आहे.

गेल्या मंगळवारीही न्यायालयाने असाच एक दावा फेटाळला होता. त्यामुळे बायडेन यांच्या सत्तारोहणात कायदेशीर अडथळे आणण्याचे ट्रम्प यांचे अखेरचे प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत. जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्वेनिया व विस्कॉन्सिन ही चार राज्ये निवडणुकीचे पारडे फिरविण्यासाठी निर्णायक ठरणारी होती. तेथे आपण बाजी मारू अशी ट्रम्प यांना आशा होती. परंतु तेथील मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली व बायडेन यांचा विजय झाला होता. मतदारांनी दिलेला कौल ट्रम्प यांनी खुल्या दिलाने स्वीकारलेला नाही. निवडणुकीत मोठा घोटाळा करून बायडेन जिंकले असा त्यांचा आरोप आहे. पण याचे ठोस पुरावे ते किंवा त्यांचा रिपब्लिकन पक्ष देऊ शकलेला नाही.

आताच्या निकालावर ट्रम्प मोठी आशा लावून बसले होते. न्यायालय सुरू होण्याच्या काही तास आधी त्यांनी  ट्विट केले होते की, सर्वोच्च न्यायालयाने शहाणपण व धैर्य दाखविले तर अमेरिकी जनतेचा इतिहासातील बहुधा सर्वांत महत्त्वाचा विजय होईल व देशाच्या निवडणूक प्रक्रियेस पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होईल. निकालानंतर हताश झालेल्या ट्रम्प यांनी संतापाने दुसरे ट्विट केले : सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षाभंग केला.

शहाणपण नाही व धैर्यही नाही. निवडणुकीनंतर प्रकरण कोर्टात गेले तर आपल्या बाजूच्या न्यायाधीशांचे तेथे बहुमत असावे या हेतूने ट्रम्प यांनी नैतिकतेचे संकेत मोडून न्या. रुथ बदेर गिन्सबर्ग यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर आपल्या मर्जीतील न्यायाधीश निवडणूक  धामधुमीच्या संक्रमण काळात नेमला होता. पण  त्याचाही काही उपयोग झाला नाही. गेल्या महिन्यातील मतदानाने निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता पुढचा टप्पा ‘इलेक्टोरल कॉलेज’ने नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा आहे. ही प्रक्रिया सोमवारी व्हायची आहे. ‘इलेक्टोरल कॉलेज’मधील प्रतिनिधी थेट  मतदानातील मतांच्या प्रमाणात ठरतात. त्यामुळे ‘इलेक्टोरल कॉलेज’ही बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करेल हे नक्की. बायडेन यांचे सत्ताग्रहण २० जानेवारी या ठरलेल्या दिवशी होईल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER