सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक, पेडणेकर म्हणाल्या ‘आता तरी बोध घ्या’

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मुंबई महापालिकेचे (BMC) कौतुक केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारने मुंबई प्रशासनाकडून माहिती घ्यावी. त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा कसा व्यवस्थित ठेवला हे पाहावे. त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेता येतात का तेही पाहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले. दरम्यान, कोर्टाच्या याच वक्तव्यानंतर राज्यात मोठं राजकारण रंगलं आहे. शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका असे म्हणत मुंबईत अजूनही बेड उपलब्ध होत नाहीत. लसीकरणासाठी गोंधळ उडाला आहे, असा आरोप केला. तर कोर्टाने केंद्राची कानऊघडणी केली आहे. त्यांनी आतातरी बोध घ्यावा असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजपवर पलटवार केला.

ऑक्सिजन पुरवठा आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरुन भाजप नगरसेवकांनी ५ मे रोजी आंदोलन केले. त्यांनी लस तुटवडा तसेच इतर कोरोनाविषयक सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला. तसेच मुंबई (Mumbai) मनपा कोरोनाविरोधात नियोजन करण्यासाठी संपूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीकासुद्धा केली. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी भाजपचे नगरसेवक आंदोलन करणार आहेत हे मला माहिती असते, तर मोफत लसीसाठी मी स्वत: सहभागी झाली असते, अशा शब्दात चिमटा काढला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची कानउघडणी केली आहे. मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्याचा बोध आतातरी संबंधितांनी घ्यावा, असेदेखील पेडणेकर म्हणाल्या.

ही बातमी पण वाचा : कर्नाटकने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला; महाराष्ट्राची केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button