‘व्हर्च्युअल’ सुनावणी यंत्रणेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती नाराज

Supremecourt
  • सदोष यंत्रणेमुळे काम करणे अशक्य असल्याचे मत

नवी दिल्ली :- प्रकरणांची ‘व्हर्च्युअल’ (‘Virtual’ Hearing System) सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात उभारण्यात आलेल्या यंत्रणेच्या निकृष्ठ दर्जावर तीन खंडपीठांवरील किमान अर्धा डझन न्यायाधीशांनी गेल्या दोन दिवसांत जाहीररपणे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यंत्रणेतील दोषांमुळे प्रकरणांची सुनावणी घेणे अशक्य होऊन बसले आहे, असेही या न्यायाधीशांनी नमूद केले आहे.

लक्षणीय बाब अशी की सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) बाजूलाच असलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाची ‘व्हर्च्युअल’ सुनावणीची यंत्रणा मात्र विनाव्यत्यय सुरळितपणे चालत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचे रडगाणे मात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात ‘व्हर्चुअल’ सुनावणीसाठी ‘सिस्को वेबेक्स’ ही यंत्रणा वापरली जाते तर सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी ‘विद्यो’ नावाचे स्वत:चे अ‍ॅप विकसित केले आहे.

बुधवारी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ एका प्रकरणाच्या ‘व्हर्च्युअल’ सुनावणीसाठी आले तेव्हा त्यांनी हा विषय न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे काढला. संबंधित प्रकरण सुनावणीसाठी पुकारले जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नियंत्रण कक्षाकडून ‘अनम्युट’ न केले जाण्याबद्दल त्यांची तक्रार होती. ते म्हणाले की, ते (नियंत्रण कक्ष) आम्हाला ताटकळत ठेवतात. निदान आधीचे प्रकरण सुरु असताना तरी पुढच्या प्रकरणातील वकिलांना कनेक्ट केले जायला हवे. अन्यथा नेमके काय सुरु आहे, हेच कळत नाही आणि गोंधळ होतो. मंगळवारी न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढील अनुभव सांगत अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले की, तेथेही परिस्थिती खूपच खराब होती. एवढा प्रतिध्वनी येत होता की, कोणाचेच बोलणे धड ऐकू येत नव्हते.

या यंत्रणेचा पूर्णपणे फेरआढावा घेण्याची गरज आहे व आपण त्यासाठी न्यायालयाच्या  महाप्रबंधकांना पत्र लिहिणार आहोत, असे वेणुगोपाळ यांनी सांगितले. यावर न्या. राव त्यांना म्हणाले की, आम्हीही तुमच्याही सहमत आहोत. दिवसेंदिवस परिस्थिती  उत्तरोत्तर वाईट होत चालली आहे.

सुनावणीसाठी हजर असलेले ज्येष्ठ वकील सी. यू. सिंग म्हणाले की, पडद्यावरचे चित्र वारंवार दिसेनासे होते व पडदा काळा होतो. असे झाल्यावर फारच पंचाईत होते. त्यांच्याशीही सहमत होत  न्या. राव म्हणाले की, आत्ता सुद्धा आम्हाला तुमचा आवाज ऐकू येतोय, पण चित्र मात्र धुरकट दिसतंय. गेले तीन दिवस खूपच अडचणी येत आहेत.

मंगळवारी न्या. संजय कृष्ण कौल, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. हृषिकेष रॉय यांच्या खंडपीठाने तर या रद्दड यंत्रणेबद्दलचा आपला उद्वेग एका प्रकरणात दिलेल्या आदेशात लेखी स्वरूपात नोंदविला होता. त्यांनी लिहिले की, गेले दोन दिवस आम्ही खूप वैतागलो आहोत. असेच सुरु राहिले तर ‘व्हर्च्युअल’ सुनावणी घेणे अशक्य आहे. यंत्रणा एवढी खराब आहे की, समोरच्याचा आवाज ऐकू येण्याऐवजी आम्हाला आमचाच आवाज प्रतिध्वनी म्हणून ऐकू येतो. महाप्रबंधकांनी यात लक्ष घालावे, असेही खंडपीठाने नमूद केले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER