सरन्यायाधीशांनी मागितला नितीन गडकरींनाच सल्ला!

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी चक्क केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच सल्ला मागितला आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करण्याबाबतच्या प्रकरणावर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनात न्या. भूषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश होता.

रेल्वेने अवैध सॉफ्टवेअरचा नायनाट करून 60 दलालांना अटक केल्याने तात्काळ तिकीटांचा घोळ संपणार

यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन. एस. नाडकर्णी यांना सरन्यायाधीशांनी विचारणा केली की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी न्यायालयाची या प्रकरणी काही मदत करू शकतील काय? ते सर्वोच्च न्यायालयात येऊन आम्हाला प्रस्ताव समजावून सांगतील काय? वीजेवर वा हायड्रोजनवर वाहने कशी चालतील याबाबतचा प्रस्ताव आम्ही समजावून घेऊ इच्छितो! देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधाही या अंतर्गत उभारण्यात यायच्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे वायू प्रदूषणाला मोठा आळा बसू शकतो, हे येथे महत्त्वाचे.

यावेळी नाडकर्णी म्हणाले, यामुळे चुकीचा संदेश जाईल आणि याला राजकीय रंग प्राप्त होईल. राजकीय व्यक्तींनी न्यायालयात येण्यात काहीही चुकीचे नाही, असे यावर न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी याचिका दाखल केलेल्या ‘कॉमन कॉज’ संस्थेचे प्रशांत भूषण हेदेखील राजकीय व्यक्ती आहेत, याकडेही न्यायालयाने यावेळी लक्ष वेधले.