थोर सूफी संतास ‘लूटेरा’ म्हटल्याने नोंदलेले गुन्हे रद्द करण्यास नकार वृत्तवाहिनीच्या अँकरला सुप्रीम कोर्टाचा मर्यादित दिलासा

Supreme Court

नवी दिल्ली : केवळ मुस्लिमच नव्हे तर लाखो हिंदूंचेही श्रद्धास्थान असलेल्या अजमेर शरीफच्या ‘गरीबनवाज’ ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती या सूफी संताला ‘हल्लेखोर’ व ‘लुटारू’ असे संबोधून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीचे अँकर व पत्रकार अमीश देवगण यांच्याविरुद्ध नोंदलेले फौजदारी गुन्हे रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

त्या वृत्तवाहिनीवर १५ जून रोजी सादर केलेल्या ‘आर पार’ या चर्चात्मक कार्यक्रमात देवगण यांनी ह प्रक्षोभक विधान केले होते. त्यावरून त्यांच्याविरुद्ध राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगण व महाराष्ट्र अशा विविध राज्यांत एकूण सात गुन्हे नोंदविले गेले आहेत. त्यातील तीन गुन्हे पायधुनी, मुंबई; इतवारा, नांदेड व नयानगर, ठाणे या महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदले गेले आहेत.

देवगण यांनी त्या कार्यक्रमात उच्चारलेले नेमके शब्द असे होते….‘आक्रांतक चिश्ती आया…आक्रांतक चिश्ती आया…. लूटेरा चिश्ती आया….उसके बाद धरम बदले…’

‘लाईव्ह’ कार्यक्रम सादर करण्याच्या धामधुमीत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्याविषयी हे शब्द आपल्या तोंडून अनवधानाने उच्चारले गेले.  त्याबद्दल आपण समाजमाध्यमांतून व आमच्या वाहिनीवरून जाहीर माफीही मागितली.  तरीही विविध ठिकाणी नोंदविल्या जाणाºया फिर्यादी व गुन्हेहे आपल्याला निव्वळ त्रास देण्यासाठी केले जात आहे. तरी हे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका देवगण यांनी केली होती. न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल १६१ पानी निकालपत्र देऊन जाहीर केला. त्यात त्यांनी नोंदविलेले सर्व गुन्ह रद्द करण्याची देवगण यांची विनंती अमान्य केली.

गुन्हे रद्द केले जाऊ शकत नसतील तर ते निदान एकाच ठिकाणी-दिल्ली किंवा नॉयडा येथे एकत्र करावेत, अशी देवगण यांची पर्यायी विनंती होती..ती अंशत: मान्य करताना खंडपीठाने सर्व गुन्हे अजमेर येथील दर्गा पोलीस ठाण्यात एकत्रित करण्याचा आदेश दिला. देवगण यांना अटक न करण्याचा किंवा त्याँच्याविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचा आधी दिलेला अंतरिम आदेश, देवगण यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर, आरोपपत्र दाखल केले जाईपर्यंत लागू राहील,असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER