राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायू पुरवठ्याच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केला कृतिगट

Maharashtra Today

नवी दिल्ली : कोरोना (Corona) साथीच्या संकटकाळात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायू पुरवठ्याची शास्त्रीय वितरण कार्यपद्धती तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (SC) शनिवारी १२ सदस्यांचा राष्ट्रीय कृतिगट स्थापन केला. शास्त्रीय पद्धतीने प्राणवायूचे वितरण करण्याची कार्यपद्धती तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर अशा कृतिगटाची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice Dhananjay Chandrachud) आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा ( M. R. Shah ) यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. केंद्र सरकारकडे उपलब्ध प्राणवायूचे वितरण आणि पुरवठा याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्राणवायू वितरणाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

जोपर्यंत कृतिगटाच्या शिफारशी सादर केल्या जात नाहीत तोपर्यंत प्राणवायू पुरवठा आणि वाटप पद्धतीत बदल होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. केंद्रीय सचिव या राष्ट्रीय कृतिगटाचे समन्वयक असतील व केंद्रीय आरोग्य सचिव पदसिद्ध सदस्य असतील.

याशिवाय, या कृतिगटात पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भाबातोष बिस्वास, दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे प्रमुख डॉ. देवेंद्रसिंग राणा, बंगरुळूतील  नारायण हेल्थकेअरचे कार्यकारी संचालक डॉ. देवीप्रसाद शेट्टी, वेल्लोर येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग आणि वेल्लोर ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. व्ही. पीटर, गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश त्रेहान, मुंबई-मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. झरीर एफ. उदवादिया, डॉ. सौमित्र रावत, डॉ. शिवकुमार सरिन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव तसेच केंद्रीय कॅबिनेट सचिव यांचाही कृतिगटात समावेश आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा बळी गेला. प्राणवायूचा अखंडित पुरवठा होण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कृतिगटाची स्थापना केली आहे. हा कृतिगट शास्त्रीय पद्धतीने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायूचे वाटप करण्याची पद्धत निश्चित करेल.

Check Pdf : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायू पुरवठ्याच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केला कृतिगट  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button