भाजपची साथ दिल्यास, राष्ट्रवादीला राज्यासह केंद्रातही मंत्रिपद मिळण्याची शक्यता

pm modi-sharad pawar

मुंबई : कोणत्या पक्षासोबत सत्तास्थापन करण्याच अद्याप काहीच ठरलेलं नाही, तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत एकसुत्री कार्यक्रमासाठी कोणतीही बैठक झाली नाही, असं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. मात्र शरद पवारांच्या विधानामुळे राज्यात नवं राजकीय समीकरण जुळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रशंसा केल्याने राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या गुगलीमुळे शिवसेनेच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना धक्का

सत्तेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार आहे, असे त्या पक्षाचे नेते खासगीत सांगत आहेत. भाजपचे १०५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यांचे संख्याबळ १५९ होते, शिवाय भाजपला लहान पक्ष व अपक्ष अशा १४ आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ १७३ होते. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे ५४ सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात २३४ सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला ११७ आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे ११९ आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीने राष्ट्रवादीने २0१४ साली भाजपला मदत दिली होती.

आता सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्यास त्यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद व १५ मंत्रिपदे मिळू शकतात, शिवाय केंद्रात एक अथवा दोन मंत्रिपदे दिली जातील. जर हेही समीकरण जुळले नाही तर भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.