‘नाणार’ला मिळते आहे समर्थन!

Green Refinary Project

राजापूर : ‘नाणार रिफायनरी’ (Nanar-refinery-project) होऊ देणार नाही, हा मुद्दा शिवसेनेने (Shivsena) प्रतिष्ठेचा केला आहे; मात्र गेल्या काही दिवसांत या भागात नाणारला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत. नपच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे म्हणालेत की, या प्रकल्पाला ८० टक्के जनतेचे समर्थन असेल तर सत्ताधारी गट त्याचा सन्मान करेल. या चर्चेच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर होते. या तीन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाची व्याप्ती दहा-बारा गावांमध्ये आहे. तसेच या प्रकल्पाचा फायदा केवळ राजापूर तालुक्यालाच होणार नसून पूर्ण जिल्ह्याला होणार आहे.

यातून होणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे राजापूर नपच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होईल, असे म्हणत सत्ताधारी गटाचे नगरसेवक गोविंद चव्हाण (भाजपा) यांनी प्रकल्पाचे समर्थन केले. याबाबत तालुका वकील संघटनेनेही नगराध्यक्षांना पत्र दिले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.पत्राच्या वाचनानंतर त्यावर चर्चा झाली. काँग्रेसच्या नगरसेविका मुमताझ काझी म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे १५० किलोमीटर परिसरातील आंब्याची झाडे नष्ट होतील.

त्यावर स्नेहा कुवसेकर म्हणाल्या की, प्रकल्पग्रस्त भागातील जनतेचा प्रकल्पाला पाठिंबा असेल तर ठराव करावा. उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, परवीन बारगीर व आसिफ मुजावर यांनी प्रकल्पाचे समर्थन करताना, या भागात असे प्रकल्प आल्याशिवाय या तालुक्याचा आणि राजापूरचा विकास होणार नाही, असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय ओगले यांनीही प्रकल्पाचे समर्थन केले. ते म्हणालेत, विकास होण्यासाठी प्रकल्प आवश्यक आहे.

काँग्रेसचा संभ्रम

नगराध्यक्ष (काँग्रेस) ऍड. जमीर खलिफे म्हणालेत की, जनतेला प्रकल्प हवा असेल तर काँग्रेस जनतेसोबत राहील. मात्र, त्याच वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुभाष बाकाळकर म्हणालेत की, या प्रकल्पामुळे या भागात मोठ्या संख्येत उद्योग-धंदे येतील हे खरे असेल  तर काँग्रेसने अजून या प्रकल्पाच्या बाजूने किंवा विरोधात भूमिका घेतलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER