पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात प्रचाराचा सुपर संडे

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी (दि.१) मतदान होत आहे. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्राचाराची सांगता झाली. रविवारची सुट्टी कॅश करत नेते, उमेदवार आणि समर्थकांनी दिवसभर मेळवे, भेटीगाठी आदींवर भर दिला. यानिमित्ताने जिल्हाभर प्रचाराचा धुरळा उडाला. प्रचाराची सांगता झाली असली तर पडद्यामागील घडामोडी वेगावल्या आहेत.

पदवीधर मतदार संघात भाजपचे (BJP) उमेदवार संग्राम देशमुख (Sangram Deshmukh), महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अरुण लाड (Arun Lad) आणि जनता दल सेक्युलरचे शरद पाटील (Sharad Patil) यांच्यासह ६५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात पदवीधरचे सुमारे ८९ हजार मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यासह ३५ उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्यात १२ हजार शिक्षक मतदार आहेत. गेली महिनाभर निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे. यानिमित्ताने नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचारानिमित्ताने जिल्हा पिंजून काढला. या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी संपली.

रविवारची सुट्टी निमित्ताने अधिकाधिक पदवीधर आणि शिक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार आणि समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. तालुकास्तरावर सभा आणि मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांनी तालुकावार कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून प्रचार आणि मतदान दिवशीचे नियोजन केले. प्रमुख कार्यकर्त्यांनी फोनव्दारे मतदारांशी संपर्क साधून उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. बुथ प्रमाणे कार्यकर्त्यांचे नियोजन करुन अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे नियोजन केले आहे. मतदार यादीप्रमाणे कार्यकर्त्यांना जबादारी सोपविण्यात आली आहे. उद्या सोमवारी दुपारनंतर याबाबत सर्वच उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेकडून शेवटचा आढावा घेतला जाणात आहे. दरम्यान, रविवारच्या सुट्टी निमित्त शिक्षक आणि पदवीधर मतदारांना संपर्क करुन प्रचार करण्यात यंत्रणा व्यस्त दिसत होती.

जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी नाराजी दूर करत, रुसवे फुगवे काढत मागण्यांबाबत आश्वासन दिले जात आहे. एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. यानिमित्ताने पडद्यामागील घडामोडी वेगावल्या आहेत. विरोधी उमेदवार आणि यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी खास माणसांची नेमणूक केली आहे. प्रत्येक घडामोडीची माहिती प्रमुख नेत्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. डॅमेज कंत्रोल करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नेते आणि उमेदवारांची ही खास यंत्रणा सक्रिय राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER