सनी देओलचा लहान मुलगा सलमानच्या भाचीसोबत राजश्री प्रोडक्शनच्या सिनेमातून एंट्री करणार बॉलिवूडमध्ये

बॉलिवूडमध्ये वंशवाद नाही असे कितीही उच्चरवाने म्हटले जात असले तरी तसे नाही. बाहेरून बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी येणाऱ्यांना ब्रेक मिळावा म्हणून अनके वर्ष संघर्ष करावा लागतो. ब्रेक मिळाला तरी नियमित काम मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. पण बॉलिवूड स्टारकिड्सना मात्र सगळे आयते मिळते. दोन दिवसांपूर्वीच संजय कपूरची मुलगी शनायाला करण जोहर लाँच करणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. आता आणखी एक स्टार सन आणि स्टार डॉटर बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. हे नवे स्टार किड्स आहेत सनी देओलचा (Sunny Deol) लहान मुलगा राजवीर (Rajvir Deol) आणि अभिनेता अतुल अग्निहोत्रीची मुलगी आणि सलमान खानची भाची अलिजेह (Alizeh Agnihotri) राजश्रीच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाली आहे.

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. बॉबी देओलची सेकंड इनिंग जोरदारपणे सुरु झाली आहे. सनी देओलने देओल कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा त्याचा मुलगा करण देओलला गेल्या वर्षी ‘पल पल दिल के पास’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर आणले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. सनी देओल आता करणला घेऊन अपने २ तयार करीत आहे तसेच करणने आणखी दोन सिनेमे साईन केल्याचेही सांगितले जात आहे. एकीकडे करणचे करिअर आकार घेत असतानाच आता सनी देओलचा लगान मुलगा राजवीरही सिनेमात येण्यास तयार झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री प्रोडक्शन एक रोमँटिक कॉमेडी तयार करीत असून त्यांना नव्या चेहऱ्यांची आवश्यकता होती. या सिनेमासाठी सनी देओलचा मुलगा राजवीर आणि सलमान खानची भाची अलिजेहला साईन करण्यात आले आहे. या सिनेमाचे यावर्षी शूटिंग सुरु केले जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. दोने नवे चेहरे एकत्र येत असल्याने या सिनेमाकडे सगळ्या बॉलिवूडचे लक्ष लागलेले असून जर कोरोनाचा प्रभाव कमी झाला तर एका भव्य समारंभात या दोघांचे लाँचिंग केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्रीचा या सिनेमाची संपूर्ण टीम तरुण असणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सूरज बडजात्याचा मुलगा अवनीश बडजात्यावर (Avnish Barjatya) सोपवण्यात आलेली आहे. अवनीशचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न असून वडिल सूरजप्रमाणे तो एक सुपरहिट सिनेमा बनवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. राजवीर आणि अवनीशची मैत्री असल्याने नायक म्हणून राजवीरला साईन करण्यात आले आहे. सलमान खान आणि राजश्री प्रोडक्शनचे अत्यंत चांगले संबंध असल्याने सलमानच्या सांगण्यावरून त्याची भाची अभिनेता अतुल अग्निहोत्री आणि अलवीरा खानची मुलगी अलिजेह अग्निहोत्रीला नायिका म्हणून साईन करण्यात आले आहे.

एकूणच यावर्षीही अनेक स्टार किड्स आपल्याला रुपेरी पडद्यावर येताना दिसणार आहेत. धर्मेंद्रची दोन्ही मुले सनी आणि बॉबी ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये यशस्वी झाले तसेच आता सनीची दोन्ही मुलेही बॉलिवूडमध्ये देओल कुटुंबाचे नाव राखून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER