सुनीलकुमारला कुस्ती खेळण्यासाठी भावाशी जिंकावी लागली होती शर्यत

SunilKumar

नवी दिल्ली : आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुनीलकुमारने मंगळवारी 87 किलोगटाचे सुवर्णपदक जिंकले आणि भारताचा ग्रिको रोमन कुस्तीतील 27 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला.मात्र मुळात कुस्ती खेळण्यासाठी त्याला आपल्या भावाशीच शर्यत जिंकावी लागली होती. त्यानंतरच त्याला कुस्ती खेळायची संधी मिळाली होती.

यामागची कहाणी मोठी मनोरंजक आहे. झाले असे की, सुनीलकुमारचे वडिल अश्विनीकुमार हे 2007 मध्ये एका लग्नाला गेले होते. त्यांनी पाहिले की त्या विवाह समारंभात कुस्तीगिरांना मानसन्मान देण्यात आला. ते बघून अश्विनीकुमार यांनाही वाटले की आपल्या मुलांनीही कुस्तीगिर बनावे. पण त्यांच्या घरात आणि त्यांचे गाव डाबरपूर (सोनेपत) येथे ना तर पहिलवान होते ना कुस्तिचे वातावरण. तरीही अश्विनींनी ठरवलेच की आपल्या चार मुलांपैकी एकालातरी पहिलवान बनवायचेच. जेणेकरुन तो आपले नाव रोशन करेल. पण चार-चार मुलांना पहेलवानीसाठी आवश्यक खूराक आणि प्रशिक्षण देण्याची त्यांची ऐपत नव्हती. म्हणून चारही मुले नाही तर त्यापैकी कुणा एकाला तरी पहेलवान बनवायचा निर्धार त्यांनी केला होता. पण कुणाला पहिलवान बनवायचे हे कसे ठरवणार?

यासाठी अश्विनीकुमार यांनी आपल्याच मुलांमध्ये शर्यत घेतली आणि त्या शर्यंतीत जो जिंकेल त्याला कुस्ती खेळू देण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.या शर्यतीच्या आठवणी सुनीलकुमारचा मोठा भाऊ सुमीतने सांगितल्या आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुसार ही शर्यत काही चांगल्या आणि सरळ रस्त्यावर झाली नव्हती तर नांगरणी करुन पाणी सोडलेल्या चिखल झालेल्या शेतात झाली होती. म्हणजे धावणे तर सोडाच पण चालणेसुध्दा कठीण असे पाय चिखलात फसणाऱ्या शेतात ही शर्यत झाली आणि त्यात चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या सुनीलने बाजी मारली आणि आता त्याने भारताला तब्बल 27 वर्षानंतर ग्रिको रोमन कुस्तीत आशियाई सुवर्णपदक जिंकून दिले आहे. या शर्यतीतून एकतर त्याची कुस्ती खेळायची खरोखरच इच्छा आहे का हे आणि त्याच्यात किती ताकद आहे हेसुध्दा दिसून आले. तेंव्हा वडिलांना खात्री पटली की हा खरोखरच कुस्तीत आपले नाव रोशन करेल असे सुमीत सांगतो.

सुनील आठ वर्षांचा असतानाच हा प्रसंग. आता तो 21 वर्षांचा आहे आणि गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेचे रौप्यपदक तर आता त्याने सुवर्णपदक जिंकले आहे.

वडिलांकडून परवानगी मिळाल्यावर तो हरियाणातील निदानी येथील क्रीडाशाळेत दाखल झाला. येथे त्याने कुस्तीचे डावपेच शिकेल. दुर्देवाने आपले नाव रोशन करेल अशी आशा बाळगणारे सुनीलचे वडिल, अश्विनीकुमार आता हयात नाहीत. 2010 मध्येच एका रस्ता अपघातात त्यांचे निधन झाले पण आता सुनीलने त्यांचे स्वप्न पूर्ण करुन त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली वाहिली आहे.

सुनीलने फ्रीस्टाईल कुस्तीत सुरूवात केली पण 2015 पासून तो ग्रिको रोमन शैलीकडे वळला. आणि पुढल्याच वर्षी आशियाई ज्युनीयर स्पर्धेत त्याने कास्यपदक जिंकले. पुन्हा 2017 व 2018 मध्येही तो कास्यपदक विजेता ठरला. त्यानंतर वरिष्ठ गटात पहिल्यांदाच खेळताना त्याने गेल्यावर्षी आशियाई रौप्यपदक जिंकले.