सुनील तावडेंचे पाकीट म्हणते ‘खामोश’ !

Sunil Tawde

एखाद्याच्या पाकिटात ज्या व्यक्तीचा फोटो असतो ती व्यक्ती नेहमीच खास असते. पाकिटात फोटो जपून ठेवण्याइतकं त्या दोन्ही व्यक्तींचं एकमेकांशी काही तरी ट्युनिंग असतं. अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde) यांच्या पाकिटात कुणाचा फोटो आहे हे जर तुम्ही ऐकलं तर त्याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढेल. अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पाहणारे कलाकार नेहमीच पडद्यावरच्या हिरोगिरीने प्रभावित होत असतात. जे खलनायक म्हणून लोकप्रिय झाले ते खरं तर हिरो व्हायलाच आले होते; पण रुपेरी दुनियेत त्यांना खलनायक म्हणून संधी आणि प्रसिद्धी मिळाल्याची कित्येक उदाहरणं आपण पाहतो. तर हिरो आणि व्हिलन या दोन्ही पैलूंचे बादशहा असलेल्यांवरही आपण फिदा असतो. अभिनेते सुनील तावडे यांच्या आयुष्यात हिरो असला तरी व्हिलनगिरीही करणाऱ्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हाचा इतका प्रभाव आहे की त्या प्रेमापोटी आजही सुनील तावडे यांच्या पाकिटात या ऑनस्क्रीन खामोशमॅन याचा फोटो आहे.

अभिनय कारकिर्दीची ४० वर्षे पूर्ण केलेल्या सुनील तावडे यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात जरी विनोदी अभिनेता म्हणून केली असली तरी या प्रवासात अनेकविध भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने रेखाटल्या. सुनील तावडे यांच्या अभिनयाची सुरुवात ‘नटसम्राट’ या नाटकाने झाली. त्यानंतर त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरूच झाला. सिनेमामध्येही त्यांनी रंगवलेले कॅरेक्टर रोल उत्तम जमून आले. विनोदाचं टायमिंग जमलेल्या सुनील तावडे यांना त्या चौकटीतून बाहेर पडून खलनायक खुणावायला लागला तो शत्रुघ्न सिन्हाचे सिनेमे पाहून. नेमकं काय झाले आणि विनोदी भूमिकांच्या बेअरिंगमधून बॅड बॉय व्हावं असं वाटलं याचा किस्सा सांगताना सुनील तावडे एका मुलाखतीत म्हणाले होते, की अभिनयातच करिअर करायचं म्हटल्यावर सिनेमे पाहण्याचा अभ्यास तर मला करावाच लागणार होता. शत्रुघ्न सिन्हा मला हिरोपेक्षा व्हिलन म्हणून जास्त भावला. त्याची खलनायक म्हणून साकारताना डोळ्यांची, चेहऱ्याची आणि हाताची हालचाल याने मी खूप प्रभावित झालो. खलनायक असा साकारला पाहिजे की, यापूर्वी जर तो कलाकार हिरो म्हणून समोर आला असला तरी त्याचा चांगुलपणा फिका पडायला पाहिजे. नेहमीच व्हिलन करणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि हिरोची प्रतिमा असतानाही व्हिलन साकारून प्रेक्षकांच्या रागाचा धनी होणं हे खूप आव्हानात्मक आहे. शत्रुघ्न सिन्हाचा अभिनय पाहताना मीही हे विसरून जायचो की यापूर्वीच्या एका सिनेमात तो साधा, समंजस हिरो आहे. मलाही जेव्हा विनोदी पठडीतून बाहेर यायचं होतं आणि व्हिलन साकारण्याची इच्छा होती तेव्हा मी शत्रुघ्न सिन्हाच्याच पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं. त्यामुळे एकीकडे ‘का रे दुरावा’ या मालिकेत मी एक सज्जन गृहस्थ होतो तर दुहेरी मालिकेत मी पराकोटीचा दुष्ट परसू होतो. या दोन्ही रूपात प्रेक्षकांना स्वीकारायला लावण्याच्या अभिनयातील वेगळेपण कसं टिकवायचं याचे धडे मला शत्रुघ्न सिन्हानेच दिले. हेच कारण आहे की ज्यामुळे मी आजही त्याचा फोटो माझ्या पाकिटात ठेवतो.

सुनील तावडे हे सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत ब्रह्मेमामांपैकी बंधू मामांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेला त्यांचे होमपीच असलेल्या विनोदाचा टच आहे. तर ‘पिंजरा’ या मालिकेतील त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहते. दुहेरीतील परसूने तर दुष्टपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. कुणीही गॉडफादर नसताना सुनील तावडे यांनी अभिनय क्षेत्रात कमावलेलं स्थान कौतुकास्पद आहे. सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकरही अभिनय क्षेत्रातच करिअर करत आहे.

‘बॅरिस्टर’ या नाटकात सुनील तावडे यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी ८० वर्षांच्या वृद्धाची भूमिका करून शाबासकी मिळवली होती. तर एका नाटकात सैनिकाच्या भूमिकेत असताना स्टेजवर खिशातून बंदूक काढत असताना ट्रिगर दाबला गेला आणि खिशातच बार उडाल्याचा किस्सा ते नेहमी सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button