सुनील तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल : प्रवीण दरेकर

sunil tatkare & pravin darekar

रायगड : एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करणे ही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची (Sunil Tatkare) वृत्ती आहे. वीस-पंचवीस वर्षांत त्यांनी विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणले आहे. त्यांना आलेला सत्तेचा माज जनताच उतरवेल, अशी टीका भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली.

पेणमध्ये भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्च्यात तटकरेंवर टीका करताना दरेकर म्हणालेत, प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले जाते आहे. या विरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल. सुडाचे राजकारण करत असताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला. पोलिसांनी सारासार विचार न करता रात्री साडेबारा वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झडती घेतली. पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो हे तटकरेंनी यातून सिद्ध केले. याचा जाब विधानसभेच्या अधिवेशनात सरकारला विचारू.

तटकरेंशी राजकीय मैत्री असलेल्या इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. तरी पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला गेले आहे. शिवसेनेच्या आमदारांनीही शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून तक्रार दिली आहे. ही शिवेसेनेसाठी शोकांतिका आहे. तटकरे भाजपला १ नंबर राजकीय क्षत्रू मानतात. आगामी काळात आम्ही पण तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दरेकर यांनी दिला.

१६ ऑक्टोबर रोजी पेण न.प.च्या स्थायी समितीच्या सभेत नरदासचाळ येथील सांडपाण्याच्या निचऱ्याच्या समस्येबाबत गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. यावरून मुख्याधिकारी यांनी गटनेत्याच्या विरोधात पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शहानिशा न करता कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. जनतेच्या प्रश्नासंबंधी जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करणे निषेधार्ह आहे, असे दरेकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER