सत्तेत असतांना पृथ्वीराज चौहानांमुळेच शिवस्मारक लांबले – तटकरे

पुणे : अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आमची आग्रही भूमिका होती. मात्र, ते का होऊ शकले नाही याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच देऊ शकतील, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर तोफ डागली. पुढे होणाऱ्या दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने बुधवारी पुण्यात एकदिवसीय बैठकीचे आयोजन केले होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आजी- माजी आमदार तसेच सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीस उपस्थित होते.

शिवस्मारक व डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परवानग्या आमच्या काळातच पूर्णत्वास आल्या होत्या. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली नाही, असा अाराेप करून तटकरे म्हणाले, ‘सत्ताबदल झाल्यानंतर आताच्या सरकारने फक्त उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. हेच काम आम्हीदेखील करू शकलो असतो. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच मोठी भूमिका घेतली. राजकीय टीकेची सुुरुवातदेखील काँग्रेसकडून पहिल्यांदा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी आमच्यावर टीका केली. आम्ही पहिल्यांदा टीका केली नाही. प्रचाराच्या काळात उत्तर मात्र जरूर दिले’, असे तटकरे म्हणाले.