सुनील गावसकर कितीतरी महिने मुलाला भेटू शकले नव्हते, कपिल देव यांनी केली तुलना

Kapil Dev-Sunil Gawaskar

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आॕस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान घेणार असलेल्या पितृत्व रजेची चर्चा आहे. आपल्या कुटुंबाप्रती विराटने दाखविलेल्या प्रेम व काळजीचे अनेक क्रिकेटपटूंनी कौतुकसुध्दा केले आहे. माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनीसुध्दा विराटच्या पिता म्हणून नव्या भूमिकेचे व त्यासाठी त्याच्या तयारीचे कौतूक केले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतण्याआधी विराट वन डे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

नवी दिल्ली येथील एका कार्याक्रमात याबद्दल कपिल देव म्हणाले की कालपरत्वे विचारसरणी आणि गोष्टी बदलत असतात. आमच्या काळात क्रिकेटच्या व्यस्ततेमुळे सुनील गावसकर (Sunil Gavaskar) कितीतरी महिने त्यांच्या मुलाला भेटू शकले नव्हते. स्वतः विराट कोहलीसुध्दा त्याच्या वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी मैदानावर परतला होता. आता तो त्याच्या येणाऱ्या बाळासाठी क्रिकेटपासून विश्रांती घेतोय. चांगले आहे, आता हे शक्य आहे आणि विराटला ते परवडणारेसुध्दा आहे.

सांगताना कपिल देव यांनी त्यांच्या व आताच्या काळातील खेळाडूंना मिळणाऱ्या सोयीसुविधांची तुलना केली. ते म्हणतात की आमच्या काळात आम्ही कल्पनासुध्दा करु शकत नव्हतो अशा सुविधा आता खेळाडूंना मिळतात. तुम्ही आता दोन-तीन दिवसात परत येण्याजाण्यासाठी विमान घेऊ शकतात. खेळाडू या उंचीवर पोहचले आहेत हे बघून आनंद होतो. विराट अशाचप्रकारे त्याच्या कुटुंबासाठी परत येणार ही चांगली गोष्ट आहे. खेळाचे एक वेड असते हे मी समजू शकतो पण कुणाकडे बाळ येणार ही त्यापेक्षाही अधिक उत्सुकतेची व उत्साहाची बाब असते असे कपिल यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER