सुनेत्रा पवार, वरुण सरदेसाईना सुरक्षा : मात्र, फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत केली कपात

Devendra Fadnavis & Raj Thackeray & Varun Sardesai & Sunetra Pawar

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, त्यांच्या सुरक्षेचा दर्जा कमी करण्यात आला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असा जो काही संघर्ष गेले काही महिने राज्यात बघायला मिळत आहे, त्याचाच पुढचा भाग म्हणून या निर्णयाकडे बघितले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), युवासेनेचे सरचिटणीस आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची पायलट कार आणि बुलेटप्रुफ कार काढून घेण्यात आली आहे. मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ आयएएस अधिकाºयांच्या पाच सदस्यीय समितीने सुरक्षेत कपातीची आणि काही जणांना सुरक्षा देण्याची केलेली शिफारस महाविकास आघाडीने स्वीकारली. मात्र आता त्यामुळे राजकारण तापले आहे.

केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावरही सरकारने वक्रदृष्टी दाखविली आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांची वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करून त्यांना एक्स सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांच्या कन्या दिविजा यांची वाय प्लस सुरक्षा काढून एक्स सुरक्षा दिली आहे. भााजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री  सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. राम कदम, आ. प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. आशिष शेलार यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय  सुरक्षा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अस्लम शेख, संजय बनसोडे या मंत्र्यांची सुरक्षाही कमी करण्यात आली.

आता सुरक्षेतील कपातीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे आणि सुडाच्या राजकारणाचे हे लक्षण आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नक्षलग्रस्त भागातील लोकप्रतिनिधी असल्याने मला सुरक्षा दिलेली होती. आजही मी लोकप्रतिनिधी आहे पण नक्षलवाद संपला असे राज्य सरकारला वाटत असावे असा चिमटा त्यांनी काढला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, भाजप नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, बोंब आदी भावना उचंबळू लागल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ.मनमोहन सिंग यांची सुरक्षा, कर्मचारी कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, महाविकास आघाडी सरकारची नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या जिविताला आधीही धोका होता आणि आताही आहे, हा गुप्तचर यंत्रणांचा अहवाल असूनही त्याकडे दुर्लक्ष करत त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. असो, लाखो कार्यकर्ते त्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. फडणवीस यांची वाढती लोकप्रियता खुपत असल्याने आकसबुद्धीने हा निर्णय घेण्यात आल्याची टीका भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी केली. ठाकरे परिवारातील लोक घराबाहेरच पडत नाहीत तर त्यांना सुरक्षा कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला की जिवितास धोका, धमक्या या निकषांवर सुरक्षा व्यवस्थेबाबतची शिफारस वरिष्ठ अधिकाºयांची समिती सरकारला करते आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. यात राजकीय आकस नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची सुरक्षा कमी करण्यास मला फोन करून सांगितले आहे, असेही देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER