पी.चिदम्बरम व मुलाविरुद्ध ‘मनी लॉन्ड्रिंग’ खटल्यात समन्स

P. Chidambaram and his son - Maharastra Today

नवी दिल्ली : ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीतील थेट परकीय गुंतवणुकीतील गैरव्यवरांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचलनलयाने ( Enforcement Directorate-ED ) दाखल केलेल्या ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या खटल्यात येथील विशेष न्यायालयाने माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम व त्यांचा मुलगा कार्ती यांच्यासह एकूण १० ओरोपींविरुद्ध समन्स जारी केली.

या प्रकरणात ‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी  हा आदेश दिला. या खटल्यात १० आरोपींमध्ये सहा आरोपी कंपन्या आहेत. व्यक्तिगत आरोपींमध्ये चिदम्बरम पिता-पुत्रांसह पीटर मुखर्जी व चार्टर्ड अकाऊंटंट एस. भास्कररामन यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना येत्या ७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याची समन्स जारी करण्यात आली.

सादर झालेल्या आरोपपत्राचा आढावा घेता सर्व आरोपींविरुद्द‘पीएमएलए’ कायद्याच्या कलम ३ व ७० अन्वये गुन्ह्यांसाठी खटला पुढे चालविण्यास पुरेसा आधार आहे याविषयी माझी खात्री झाली आहे, असे न्यायाधीशश नागपाल यांनी समन्स काढण्याच्या आदेशात नमूद केले.

’आयएनएक्स मीडिया’ या परदेशी कंपनीने ‘आयएनएक्स न्यूज’ या भारतीय कंपनीत केलेल्या थेट परकीय गंतवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. ही गुंतवणूक झाली तेव्हा पी. चिदम्बरम देशाचे वित्तमंत्री होते. कार्ती यांच्याकरवी चिदम्बरम यांच्या माध्यमातून परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या अधिकार्‍यांना मर्यादेहून जास्त परकीय गुंतवणूक मंजूर करण्यास भाग पाडले गेले. यासाठी कार्ती चिदम्बरम यांना त्यांच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून एकूण ५६ कोटी रुपये दिले गेले, असा आरोप आहे.

यातील गुन्हेगारी कारस्थान, फसवणूक व भ्रष्टाचार या गुन्ह्यांसाठीचा खटला ‘सीबीआय’ने दाखल केला आहे. त्यातही हेच आरोपी आहेत. त्यात चिदम्बरम यांना अटकही झाली होती व नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन दिला गेला होता. याच अनुषंगाने लांच म्हणून मिळालेली रक्कम अन्यत्र फिरविल्यासंबंधीचा खटला ‘ईडी’ने दाखल केला आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER