
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD &CEO) चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन उद्योगसमुहातील कंपन्यांना कर्जे मंजूर करताना लांच घेतली व आपल्या पदाचा दुरुपयोग केला, असे सकृद्दर्शनी मत नोंदवत येथील विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate-ED) ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल केलेल्या फिर्यादीवर चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरुद्ध आरोपी म्हणून समन्स जारी केले.
‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत नांदगावकर यांनी हा आदेश दिला. कायद्याच्या भाषेत यास ‘प्रोसेस इश्यू’ करणे असे म्हटले जाते व आरोपींवर खटला सुरु करण्याची ही पहिली पायरी असते. ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ अन्वये खटला चालविण्यासाठी हा आदेश दिला गेला. खटल्यातील आरोपी म्हणून चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व ‘व्हिडिओकॉन उद्योगसमुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांच्यासह फिर्यादीत उल्लेख असलेल्या सर्व ११ आरोपींविरुद्ध समन्स जारी करून त्यांना १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर रोहण्यास सांगण्यात आले आहे.
‘ईडी’ने केलेला तपास, सादर केलेली कागदपत्रे व तपासात नोंदविलेले जाबजबाब यावरून वेणुगोपाल धूत व व त्यांच्या व्हिडिओकॉन समूहातील कंपन्यांना आयसीआयसीआय बँकेकडून कर्जे देताना चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे, ही कर्जे कोचर यांच्या पतींच्या कंपन्यांना लाभ करून देण्याच्या स्वरूपात लाच घेऊन दिली गेली आणि या गुन्हेगारी कृत्यांतून मिळविलेला पैसा आरोपींनी अनेक कंपन्यांमधून फिरवून काळ्याचा पांढरा केल्याचे प्रथमदशनी दिसते, असे न्यायाधीश नांदगावकर यांनी ‘प्रोसेस’ काढण्याच्या आदेशात नमूद केले
जून २००९ ते ऑक्टोबर २०११ या काळात आयसीआयसीआय बँकेकडून धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसनमुहास दिलेल्या १,७५० कोटी रुपयांच्या पाच कर्जांच्या संदर्भात हा खटला आहे. याआधी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) याच व्यवहारांवरून कोचर, धूत व इतरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे. तेच सूत्र पकडून ‘ईडी’ने हा ‘मनी लॉन्ड्रिं‘ग’चा स्वतंत्र खटला सुरु केला आहे. ‘सीबीआय’च्या खटल्यात अटक झालेले दीपक कोचर अद्यापही तुरुंगात आहेत.
सन १९८४ मध्ये आयसीआयसीआय बँकेत नोकरीस लागलेल्या चंदा कोचर सन २००९ मध्ये त्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. आपल्या पतीचे धूत व व्हिडिओकॉनशी घनिष्ट व्यावसायिक संबंध आहेत हे चंदा कोचर यांनी कर्ज मंजुरी समितीच्या निदर्शनास आणले नाही किंवा त्यांनी त्या मंजुरी प्रक्रियेपासून स्वत:ला दूरही ठेवले नाही, असा या फिर्यादीत आरोप आहे. कोचर दाम्पत्य राहात असलेला चर्चगेट येथील ‘सीसीआय चेंबर्स’मधील पाच कोटी रुपयांहून अधिक बाजारभाव असलेला प्लॅट याच ‘काळ्या’ पैशातून अवघ्या ११ लाख रुपयांत घेण्यात आला, असाही ‘ईडी’चा दावा आहे. बँकेने व्हिडिओकॉन समुहास दिलेली ही सर्व कर्जे नंतर बुडित खात्यात टाकावी लागली. हा कथित कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेने चंदा कोचर यांना पदावरून दूर केले.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला