गृहमंत्री अमित शहांविरुद्ध बदनामी खटल्यात समन्स

Amit Shah - Abhishek Banerjee

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी खटल्यात प. बंगालमधील एका न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याविरुद्ध आरोपी म्हणून समन्स जारी केले आहे.

खासदार बॅनर्जी यांचे वकील अ‍ॅड. संजय बासू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकानुसार आमदार-खासदारांवरील खटल्यांसाठीच्या बिधाननगर येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शहा यांच्याविरुद्ध समन्स जारी केले. त्यानुसार शहा यांना येत्या सोमवारी २२ फेब्रुवारी रोजी स्वत: किवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

कोलकत्ता शहरातील मेयो रोडवर ११ आॅगस्ट, २०१८ रोजी भाजपाच्या सभेत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांबद्दल खासदार बॅनर्जी यांनी हा खटला दाखल केला आहे.

खासदार बनर्जी हे प. बंगालच्या मुख्यमांत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. उपर्युक्त सभेतील अमित शहा यांच्या पुढील वक्तव्यांवरून त्यांनी हा खटला दाखल केला आहे:

-‘ नारदा, शारदा, रोज व्हॅली सिंडिकेट भ्रष्टाचार. भाच्याचा भ्रष्टाचार. अशी ममताजींनी भ्रष्टाचाराची मालिका केली आहे.’

‘बंगालमधील खेड्यांच्या रहिवाशांनो, पैसा तुमच्यापर्यंत पोहोचला का? जरा मोठ्याने सांगा, पैसा तुमच्या गावापर्यंत पोहोचला का? पोहोचला नसेल तर तो गेला कुठे? मोदीजींनी पैसे दिले होते, मग ते

३,९५,००० कोटी रुपये गेले कुठे?  ते पैसे भाच्याला आणि त्याच्या सिंडिकेटला दान करून टाकण्यात आले आहेत.’
वरीलप्रमाणे धादांत असत्य विधाने करून अमित शहा यांनी आपली बदनामी केली, असे खासदार बॅनर्जी यांचे म्हणणे आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER