उन्हाळी लागणे / मूत्रदाह – आहार विहार नियोजन महत्त्वाचे !

वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरवात झाली की काही आजार नेमके डोके वर काढतात. घोमोळे, कांजण्या, नाक फुटणे वगैरे. तसाच एक आजार आहे,उन्हाळी लागणे. उन्हाचा तडाखा सुरु झाला की घामाचे प्रमाण व शरीरातील उष्णता अधिक होते. हळूहळू मूत्र प्रवृत्ती पिवळ्या वर्णाची व लघवी करतांना दाह होतो. ओटीपोटात कळ येणे. मूत्रेंद्रियाची आग होणे किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसतात. कधी कधी रक्तवर्णी मूत्र प्रवर्तन होतांना दिसते. शरीरात कणकण देखील जाणवते. मूत्रपरीक्षण केल्यास इंन्फेक्शन, अॅसिडीक यूरीन किंवा पस सेल वाढलेले दिसतात.

उन्हाळी लागण्याची कारणे काय असू शकतात ?

वातावरणातील उष्णता, पाणी कमी पिणे, उष्माघात, चहासारखी उष्णपेयाचे अतिसेवन, अग्निजवळ जास्त काळ उभे राहणे. उन्हात जास्त वेळ काम करणे, तंबाखू – धूम्रपान – मद्यपान. आहारात तिखट मसालेदार पदार्थाचे सतत सेवन, अति क्रोध, रात्री जागरण, जीन्स कृत्रिम धागेयुक्त कपडे सतत व जास्त वेळ घालणे.

उन्हाळा सुरू झाला की साहजिकच तहान जास्त लागते. शरीराला ज्या गोष्टीची गरज असते ती भावना आपोआप निर्माण होत असते. त्यामुळे माठातील थंड पाणी प्यावे जेणेकरून तहान भागेल. सिद्धजल घेणे हा खूप छान उपाय यावर आहे. उदा. धण्याचे पाणी घेणे, वाळा घातलेले सुगंधी पाणी घेणे, नागरमोथा वाळा घातलेले पाणी घेणे हे सर्व सिद्धजल मूत्राचे प्रमाण वाढवितात शिवाय दाहशामक कार्य करतात. ऊसाचा रस, नारळ पाणी, कोकम सरबत देखील या काळात उष्णता सुसह्य करणारे ठरते.

मलावरोध असल्यास त्रिफळा, हिरडे चूर्ण किंवा काळ्या मनुकाचा काढा रात्री झोपतांना घ्यावा. साळीच्या लाह्या पाण्यात टाकून घेणे. लाह्याचे पाणी ORS प्रमाणे कार्य करते. गार पाण्यात बसणे ( अवगाह) , ओटीपोटावर थंड पाणी ओतणे, चंदनाचा लेप लावणे या बाह्य चिकित्सा मूत्रदाहात उपयोगी ठरतात. गोक्षुर, चंद्रप्रभा, चंदनासव, पूनर्नवा इ. औषधे मूत्रदाहावर तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन पोटातून घेतल्यास फायदा होतो. ऋतुनुसार आहार विहारात बदल आवश्यक ठरतो. त्यामुळे अतिश्रम व्यायाम मसालेदार जेवण जागरण करू नये. ऋतुनुसार आहार घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER