सुमित नागलने मिळवून दिले सात वर्षांतील पहिले यश

Sumit Nagal

अखेर ग्रँड स्लॅम टेनिस (Grand Slam Tennis) स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या विजयाचा दुष्काळ सुमित नागलने (Sumit Nagal) संपवला. यू . एस. ओपनच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लानवर (Bradley Klahn) ६-१, ६-३, ३-६, ६-१ असा विजय मिळवला.

यासह गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीचा सामना जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. याआधी २०१३ च्या यू. एस. ओपनमध्येच सोमदेव देवबर्मनने पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तो आंद्रियास सेप्पीकडून पराभूत झाला होता.

आता नागलसमोरसुद्धा दुसरा मानांकित ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएमचे आव्हान आहे. नागलने गेल्या वर्षी रॉजर फेडररविरुद्ध एक सेट जिंकला होता. गेल्याच आठवड्यात त्याने स्टोन वावरिंकाविरुद्धही सेट जिंकला होता. त्यामुळे थिएमचा सामना तो आता कसा करतो हे बघण्यासारखे आहे. थिएम हा तीन वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. पहिल्या फेरीत त्याचा प्रतिस्पर्धी जौमे मुनार याने ७-६, ६-३ असा पीछाडीवर पडल्यानंतर दुखापतीमुळे सामना सोडून दिला.

सुमित नागलसाठी यू. एस. ओपनच्या आठवणी नेहमीच चांगल्या राहिल्या आहेत. येथे २०१३ मध्ये ज्युनिअर गटाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता तर आता सलग दुसऱ्या वर्षी तो मेन ड्रॉमध्ये खेळतो आहे.

क्रमवारीत क्लान १२८ व्या तर नागल १२२ व्या स्थानी आहे. या दोघांदरम्यानचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे या सामन्यात नागलचे पारडे वरचढ मानले जात होते आणि या अपेक्षांसह मैदानात उतरणे सोपे नव्हते. माझ्या पहिल्या ग्रँड स्लॅम सामना विजयासाठी मी काहीसा बेचैन होतो. पण त्यासाठी मला जे करायचे होते ते मी केले आणि गडबडलो नाही, असे तो सामन्यानंतर म्हणाला. २ तास १२ मिनिटांचा हा सामना त्याने आपल्या सहाव्या मॅच पॉइंटवर संपवला. विशेष म्हणजे पूर्ण सामन्यात नागलने फक्त एक एस लगावली.

पहिल्या सेटमध्ये सुमितने क्लानची सर्व्हिस तीन वेळा भेदली. दुसऱ्या सेटमध्येही त्याने क्लानच्या चुकांचा पुरेपूर फायदा उचलला.

तिसऱ्या सेटमध्ये सुमितने सर्व्हिस आणि सेट ३-६ असा गमावला. चौथ्या सेटमध्ये मात्र त्याने अजिबात संधी न दवडता ५-० आघाडी घेतली आणि सामना संपवला.

आता थिएमचा सामना करण्याबद्दल तो म्हणतो की, मी तयार आहे आणि त्याच्याशी खेळायला मी उत्सुक आहे. मजा तर येईलच; शिवाय माझा खेळ कुठवर आहे याचीही पारख होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER