दमदार खेळाचे दर्शन घडवून सुमित नागलचे आव्हान संपले

युएस ओपन टेनिस स्पर्धेत (US Open Tennis) अंदाजाप्रमाणे भारताच्या सुमित नागलचे (Sumit Nagal) आव्हान दुसऱ्या फेरीत संपले. ऑस्ट्रियाच्या द्वितीय मानांकित डॉमिनिक थिएमने (Dominic Thiem) आपल्या वाढदिवशी त्याच्यावर 6-3, 6-3, 6-2 असा विजय मिळवला. आर्थर ऍश स्टेडियमवरचा हा सामना सुमितने गमावला असला तरी त्याच्या खेळाने त्याने अनेकांची मने जिंकली.

गेल्या वर्षी तो या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत रॉजर फेडररकडून बाद झाला होता.यंदा क्रमवारीच्या आधारे मुख्य गटात स्थान मिळाल्यावर ग्रँड स्लॅम स्पर्धेची पहिली फेरी पार करणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिला भारतीय टेनिसपटू ठरला होता.

सुमितने दोन मॅचपॉईंट वाचवले. पहिल्यावर सुमितचा फोरहँड बाहेर पडल्यावर थिएमने चेंडू जाळीत मारल्याने ड्युस झाला त्यानंतर थिएमने एका वेगवान बॕकहँड डाउन द लाईन फटक्यावर तिसरा मॅचपॉईंट मिळवला आणि नागलचा परतीचा फटका मैदानाबाहेर पडल्याने थिएमचा विजय निश्चित झाला. हा सामना साधारण दोन तास पाच मिनीटे रंगला.

तिसऱ्या सेटमधील पाचवा गेम तब्बल आठ मिनिटे झुंजल्यावर नागलने सर्विस कायम राखण्यात यश मिळवले. यात त्याने कोर्टच्या अगदी कडेला मारलेला पासिंग शॉट भन्नाट होता. या सामन्यात नागलला त्याच्या सर्विसने दगा दिला.दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा सर्विस गमावून नागल 2-5 असा पिछाडीवर पडला होता पण त्यानंतर थिएमची सर्विस भेदून त्याला संधी होती पण ती त्याला साधता आली नाही. पहिल्या सेटमध्येही नागलने सुरुवातीलाच सर्विस गमावली होती पण नंतर त्याने ब्रेक बॅक केला होता.

23 वर्षीय सुमित जागतिक क्रमवारीत 124 व्या स्थानी आहे. त्याची ही वाटचाल अपघाताने नाही तर मेहनतीने आहे. कोरोनाने सारे काही मार्चमध्ये ठप्प पडले तेंव्हा तो भारतात न परतता जर्मनीतच थांबला आणितेथील साश्चा नेन्सेल अकादमीत त्याने आपला सराव सुरुच ठेवला होता. गेल्या मे पासून तो सातत्याने सरावात होता. जर्मनी व स्वीत्झर्लंडमध्ये तो काही प्रदर्शनी स्पर्धा खैळला. त्यानंतर प्राग चॕलेंजर स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली.

कोरोनाने प्रत्येकालाच सवड मिळवून दिली पण सुमितने त्या सवडीचा योग्य उपयोग केला. त्याच्या खेळात व फिटनेसमध्ये त्यामुळेच सुधारणा दिसून आल्याचे भारतीय टेनिसपटू सोमदेव देवबर्मनने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER