सुमीत नागल बनला भारताचा नंबर वन टेनिसपटू

Sumit Nagal becomes number one Tennis player

सुमीत नागल हा भारताचा नवा नंबर वन टेनिसपटू बनला आहे. असोसिएशन आॕफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) च्या ताज्या क्रमवारीत तो 127 व्या स्थानी आहे तर आतापर्यंत भारताचा अव्वल खेळाडू राहिलेल्या प्रज्नेश गुनेश्वरनची 134 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे सुमीत हा आता भारताचा अव्वल टेनिसपटू ठरला आहे.

22 वर्षीय सुमीत आता 127 व्या स्थानी असला तरी यंदाच 3 फेब्रुवारीला तो क्रमवारीत 125 व्या स्थानी होता आणि आतापर्यंत त्याने क्रमवारीत गाठलेले हे सर्वोच्च स्थान होते. त्यावेळी प्रज्नेश गुनेश्वरन हा 122 व्या स्थानी होता. मात्र ताज्या क्रमवारीत गुनेश्वरन आठवडाभरात 125 वरुन 134 व्या स्थानापर्यंत घसरल्याने सुमीतने प्रथमच गुनेश्वरनच्या वरचे स्थान मिळवले आहे. मात्र 22 एप्रिल 2019 च्या क्रमवारीत प्रज्नेश 75 व्या स्थानापर्यंत पोहोचला होता.तेथवर पोहोचण्यास सुमीतला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

सुमीत हा या आठवड्यात एटीपीची पौ चॕलेंजर स्पर्धा खेळणार आहे तर प्रज्नेश दुबई ओपनमध्ये खेळणार आहे.