
कलाकार मंडळी वैयक्तिक आयुष्यात अनेक भन्नाट गोष्टी करत असतात. त्यातल्या काही गोष्टी ह्या केवळ प्रसिद्धीपुरत्या असल्या तरी खरंच काही उपक्रम असे असतात की, ते आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशाने करत असतात. कलाकारांना जेव्हा उद्घाटनासाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते तेव्हा त्यांच्या नजरेला अशा काही गोष्टी दिसतात आणि त्यातूनच ते वेगळ्या अर्थाने मदतीचा हात देत असतात. अभिनेता सुमित राघवन यानेही एक अशीच गोष्ट केली आहे. तो एका बिबट्याचा दत्तक पालक बनला आहे.
अभिनय, निवेदन, गाणं, डबिंग या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुशाफिरी करत असलेल्या सुमित राघवनने एका बिबट्याला दत्तक घेतलं आहे. हे वाचून तुमच्या मनात पहिला प्रश्न असाही येऊ शकतो की, मग सुमितने घरात बिबट्या पाळला आहे का ? तर सुमितने या बिबट्याला घरी आणून पाळलेले नाही, तर हा बिबट्या प्राणिसंग्रहालयातच आहे. परंतु त्याचा सगळा खर्च हा सुमित करतो आणि अशा अर्थाने सुमित बिबट्याचा बाबा झाला आहे. सुमितने दाखवलेल्या या प्राणिप्रेमाला त्याच्या चाहत्यांनी दाद दिली आहे.
सुमित राघवनने (Sumeet Raghavan) म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा येतात. सुमित खूप चांगला अभिनेता तर आहेच; पण तो एक हजरजबाबी आणि उत्तम निवेदक आहे. वसंतराव कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांच्याकडे त्याने गाण्याचे धडे गिरवले आहेत. याशिवाय त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केल्यामुळे रंगभूमीशीही त्याचा खूप जवळचा संबंध आहे. अनेक इंग्रजी चित्रपटांसाठी त्याने डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. मुळातच मनोरंजनाच्या क्षेत्रात तिशीनंतर आलेल्या सुमितने गेल्या १५ वर्षांत मोजके पण निवडक काम करून प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात बाजी मारली आहे. एकीकडे त्याचा हा विविध कलाकौशल्यांचा प्रवास तेजीत सुरू असतानाच बिबट्याला दत्तक घेऊन त्याने एक सामाजिक संदेशदेखील दिला आहे.
सुमित सांगतो, आपल्याला अनेकदा असं वाटत असतं की, आपण काहीतरी समाजासाठी करावं. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष कामातून वेळ काढून सामाजिक संस्थाच उभारली पाहिजे असे नाही. तर आपण एखाद्या संस्थेला जोडले जाऊनसुद्धा अशा पद्धतीची मदत करू शकतो हे मला या बिबट्याच्या दत्तक अनुभवातून जाणवले. त्याचं झालं असं की, मी रिव्हर मार्च नावाच्या एका संस्थेच्या कार्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होतो. त्या ठिकाणी झालेल्या गप्पांमध्ये मला त्या संस्थेने असे सांगितले की, तुम्हाला मुंबईचे टोक बघायला आवडेल का ? त्यांच्या या प्रश्नाने मीदेखील अचंबित झालो. मी मुंबईत राहात असूनसुद्धा नेमकी मुंबई कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे मला माहिती नव्हतं. शिवाय मुंबईतल्या ज्या नद्या आहेत त्यादेखील सध्या सिमेंटच्या जंगलात हरवून गेल्या आहेत. त्या नद्यांना प्रवाही करण्यासाठी रिव्हर मार्च ही संस्था काम करत होती. त्यांच्यासोबत मी एकदा भटकंतीला गेलो असताना मुंबईतल्या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्या ठिकाणी जेव्हा फिरत होतो तेव्हा तिथल्या प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांनी सांगितले की, आम्ही इथले प्राणी दत्तक देतो. मला ही कल्पना खूप आवडली. अजून त्याची माहिती घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही कुठल्याही एका प्राण्याचा वर्षाचा खर्च देऊ शकता आणि त्या दृष्टीने तुम्ही त्या प्राण्याचे दत्तक पालक होऊ शकता. त्या दिवसापासून मी एक बिबट्याचे पालकत्व जगतोय. महिन्यातून एकदा त्याला जाऊन भेटून येतो. त्याच्याकडे मी पाहतो तेव्हा मी बिबट्याचा बाबा असल्याचा फील मला येतो ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्राणिसंग्रहालय चालवणे ही खरंच सध्याच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. वाघ, बिबट्या, सिंह यासारख्या प्राण्यांचा खर्च खूप जास्त असतो. त्यासाठी कुठेतरी आपण हातभार लावू शकलो याचा मला आनंद आहे.
महाभारत मालिकेतील सुदामा साकारलेल्या सुमित राघवन याने आजवर अनेक हिंदी, मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘संदूक’ या सिनेमातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. वेलकम होम, हद कर दी आपने, साराभाई वर्सेस साराभाई, बडी दूर से आये है- या त्याच्या कलाकृती आजही अभिनयाच्या माध्यमातून लक्षात राहतात . सुमितचे वडील तमिळ तर आई कन्नड भाषिक असल्याने त्याला या दोन्ही भाषादेखील छान अवगत आहेत. कलाकार म्हणून निवडक काम करणारा सुमित जितका संवेदनशील अभिनेता आहे तितकाच तो वैयक्तिक आयुष्यातही समाजमन जपणारा आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला