मराठा आरक्षणासाठी आत्महत्या ! ‘त्या’ तरूणाची सुसाइड नोट बनावट, गुन्हा दाखल

Fake suicide note

बीड : मराठा आऱक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असे वृत्त दोन दिवसांपूर्वी खूप चर्चेत आले होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तशी चिठ्ठीही लिहिल्याचे म्हटले होते. आता उघड झाले आहे की, सोशल मीडियावरून व्हायरल होणारी ती ‘सुसाईड नोट’ बनावट होती ! पोलिसांनी ही माहिती दिली असून यासंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गरम आहे. आंदोलन सुरू आहेत. मराठा नेत्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून ठाकरे सरकारकडून स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आऱक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी समोर आले होते.

त्यात म्हटले होते की, बीडच्या केतुरा गावात राहणाऱ्या १८ वर्षांच्या विवेक रहाडे या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने मराठा आरक्षण न मिळाल्याने गळफास घेतल्याचे वृत्त पसरले होते. त्याची म्हणून एक सुसाइड नोटही व्हायरल झाली होती. अनेकांनी या घटनेची दखल घेतली होती. पोलिसांनी या सुसाइड नोटचा तपास केला. सुसाइड नोट आणि आत्महत्या करणाऱ्या मुलाचे हस्ताक्षर तपासून पाहण्यात आले. त्यात ही नोट बनावट असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कथित नोट

या कथित नोटमध्ये म्हटले आहे – मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोथे होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच ‘नीट’ची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवतो आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER