हवालदाराची विष प्राशन करून आत्महत्या

Murder

सांगली :- पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला अत्याचार प्रतिबंध कक्षात नेमणुकीस असलेले हवालदार सदानंद मुरलीधर हेंद्रे (वय ४६) यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हेंद्रे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह मिरज तालुक्यातील तानंग गावच्या हद्दीतील एका शेतात शुक्रवारी सकाळी आढळला आहे.

कुपवाड रोडवरील पार्श्वनाथनगरमध्ये राहणारे हेंद्रे हे गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाले होते. त्यांनी दुचाकीवरून घर सोडताना घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये मला माफ करा, मुलगा आणि मुलीने चांगले शिक्षण घ्यावे, अशा आशयाचा मजकूर असल्याची माहिती आहे. हेंद्रे यांची पत्नीही पोलीस दलातच कार्यरत असून त्या लिपिक या पदावर काम करत आहेत.

ही बातमी पण वाचा : राहत्याघरी गळफास घेवून तरूणाची आत्महत्या

मिरज तालुक्यातील तानंग गावच्या हद्दीतील रस्त्याकडेच्या एका शेतात शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हेंद्रे यांचा मृतदेह आढळला. त्यांची दुचाकीही त्याच ठिकाणी होती. शेतात निघालेल्या एका व्यक्तीला हेंद्रे यांचा मृतदेह दिसल्यानंतर त्या व्यक्तीने कुपवाड एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर संबंधित मृतदेह हवालदार सदानंद हेंद्रे यांचा असल्याचे लक्षात आले. हेंद्रे यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, हे समजू शकले नाही.