कोरोना उपाययोजनेच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्याची सुहास खंडागळेंची मागणी

Suhas Khandagale

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोनाबाबतच्या उपाययोजनांसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या खर्चाचा तपशील नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करावा. त्यातून जनतेला एकूण खर्चाचा अंदाज येईल आणि पारदर्शकतेसाठीदेखील त्याची मदत होईल, अशी मागणी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे.

कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या, त्याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय कोणत्या उपाययोजना झाल्या, या उपाययोजनांसाठी कोणती तरतूद करण्यात आली, राज्य शासन आणि केंद्र शासन, जिल्हा नियोजन आणि अन्य कोणत्या माध्यमातून खर्चाची तरतूद करण्यात आली, गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी एकूण किती निधी खर्च झाला हे जाहीर करावे.

पारदर्शक कारभार आणि समृद्ध लोकशाहीसाठी अशा पद्धतीने एकूण खर्चाचा तपशील जाहीर होणे गरजेचे आहे. त्यातून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर कशा प्रकारे आणि किती प्रमाणात खर्च झाला आहे, हे लोकांना समजेल. शिवाय आणखी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचा अंदाजही जनतेला येईल, असे खंडागळे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER