उसाचा रस – एक आरोग्यदायी पेय!

Sugarcane Juice

उन्हाळा सुरु झाला की रस्त्याच्या कडेला घुंगराचा लयबद्ध आवाज असलेल्या उसाच्या रसाच्या (Sugarcane Juice) दुकानांकडे सहज गाडी वळते. रणरणत्या उन्हात शरीरात थंडावा निर्माण करणारा तृप्ती देणारा उसाचा रस थकवा दूर करतो. उसाचा रस कोल्ड ड्रिंकप्रमाणे नुसतेच तहान भागवत नाही तर अनेक आरोग्यकारक फायदे देणारा रस आहे. आयुर्वेदात उसाच्या रसाचे गुण ग्रंथकारांनी वर्णित केले आहेत.

इक्षो रसः गुरुः स्निग्धो बृहणः कफमूत्रकृत् ।
वृष्यः शीतोऽस्रपित्तघ्न स्वादुपाकरसः सरः ॥

  • ईक्षु रस म्हणजेच उसाचा रस पचायला जड, स्निग्ध, बृंहण करणारा (पुष्टी करणारा) कफ मूत्र वाढविणारा, वीर्यवर्धक, थंड, रक्तपित्तशामक, मलनिस्सरण करणारा वातहर आहे.
  • एवढे गुण या उसाच्या रसात असतात. जे कोणत्याही कोल्ड ड्रिंकमधे मिळू शकत नाहीत.
  • उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होऊन अशक्तपणा, थकवा, उन्हाळी लागणे असे त्रास होऊ शकतात. उसाचा रस ताकद देणारा, मूत्र प्रवृत्ती वाढविणारा असल्याने या ऋतुत अतिशय लाभदायक ठरतो.
  • उसाचा रस कावीळ, मूतखडा, उन्हाळी लागणे, नाकातून किंवा गुदमार्गे रक्तस्राव अशा व्याधींवर औषध म्हणून काम करतो.
  • उसाचा रस मलनिस्सारक आहे त्यामुळे बद्धकोष्ठता दूर करणारे आहे.
  • हे सर्व या रसाचे फायदे आहेतच परंतु उसाचा रस घेतांना काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे.
  • जेवल्यानंतर उसाचा रस पिऊ नये. जेवल्यानंतर रस पिल्याने तो वात वाढवितो.

उसाचा पुढील (अग्र) व मूळाकडील भाग यासकट केलेला उसाचा रस कधी पिऊ नये. अग्र व मुळाकडील भाग जंतुंनी भक्षण केलेला असतो म्हणून हा भाग त्याज्य आहे.

उसाचा रस ताजा व काढल्यावर लगेच प्यावा. जास्त वेळ ठेवलेला रस हा विरुद्ध गुणांचा होतो. दाह उत्पन्न करणारा होतो. शर्करेचे अंश असल्याने उष्णतेने त्याचे किण्वीकरण होते त्यामुळे हा रस जड आणि मलबद्धता करणारा ठरतो.

असा हा उसाचा रस आरोग्यदायी पेय आहेच. उन्हाळ्यात केमिकलयुक्त आरोग्य बिघडविणारे कोल्ड ड्रींक घेण्यापेक्षा स्वस्त सहज उपलब्ध होणारा उसाचा रस नक्कीच घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button