साखर कारखाना कामगारांचा संप मागे

strike

पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीसह विविध मागण्यांवर राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती स्थापन करुन चर्चेची तयारी दर्शविलेली आहे. त्यामुळे राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवारपासून (दि.३०) घोषित केलेला राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेत असल्याची घोषणा प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सचिव आनंदराव वायकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

साखर कामगारांच्या प्रश्नांवर माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच राज्याच्या सहकार व कामगार विभागाने साखर कामगारांच्या पगार वाढीच्या निर्णयासाठी गेली १९ महिने प्रलंबित असलेली त्रिपक्षीय समिती गठित करण्याच्या निर्णयाचेही आम्ही स्वागत करीत आहोत. या घडामोडीवर प्रतिनिधी मंडळ आणि महासंघाच्या धोरण समितीची बैठक होवून सर्वानुमते संप माघारीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भोसले, वायकर यांनी दिली.

साखर कामगार व जोडधंद्यातील कामारांच्या वेतन वाढीच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपलेली आहे. त्यावर दोन्ही संघटनांनी समित गठित करण्याची नोटिस देवून मागण्यांचा मसुदा तत्कालीन सरकारकडे आणि आत्ताच्या सरकारकडेही पत्रव्यवहार करुनही काहीच निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घोषित केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER