मारहाणीत साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा मृत्यू; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराविरुद्ध ३०२

302 against former NCP MLA -Sugar Factory - Maharastra Today

सातारा :- पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यात एका अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारासह १९ जणांवर पोलिसांनी ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. साखर कारखान्यात झालेल्या साखरेच्या अफरातफरीतून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.

घटना अशी की, पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यामध्ये जगदीप थोरात हे प्रोसेसिंग हेड होते. १० मार्च रोजी थोरात यांच्यावर साखरेची हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून कारखान्यात त्यांना मारहाण करण्यात आली. ११ मार्चला पहाटे जगदीप थोरात यांना त्रास होऊ लागला. नातेवाइकांनी त्यांना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कराड शहर पोलीस ठाण्यात जगदीप थोरात यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. थोरात यांच्या नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणी पोलिसांनी थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, सहसंचालक मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि काही कर्मचाऱ्यांविरोधात कलम ३०२ प्रमाणे वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. सहसंचालक मनोज घोरपडे यांच्यासह सहा  जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.

तणाव
जगदीप थोरात यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही तोवर शव ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा थोरात यांच्या नातेवाइकांनी घेतला होता. त्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री उशिरा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात थोरात यांचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री नातेवाइकांनी शव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER