भाजप पदाधिकाऱ्यांची शिवीगाळ; नाईकांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त गुलमंडी मंडळाचे अध्यक्ष सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांच्या नावाने पाठवला आहे. शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात शहराध्यक्ष संजय केणेकर, भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बाेराळकर, डाॅ. भागवत कराड यांच्यासमक्ष त्यांनी आपला राजीनामा केणेकरांना सुपूर्द केला. संबंंधित पदाधिकारी यांनी सुधीर नाईक यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नाईक यांनी पक्षात राहण्यास नकार दिला. आपण कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पण राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी केली.

नाईक भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी समर्थक असून, तनवाणी यांनी नुकतेच मुंबई येथे “मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधताच नाईक यांनीही भाजपला रामराम ठाेकला. पंडित दीनदयाळ यांच्या कार्यक्रमात आपणास शिवीगाळ करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नाईक यांनी म्हटले आहे. आपल्यासाेबत असलेल्या ज्येष्ठ नेत्यांसमाेर हे सर्व सुरू असताना कुणीच हे थांबवायचा प्रयत्न केला नाही.

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप, नेत्यांमध्ये जुंपली

आपला अपमान झाल्याने आता भाजपमध्ये थांबणे शक्य नसल्याचे नाईक यांनी सांगितले. भाजपचे दयाराम बसैये म्हणाले, नाईक भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांना शिवीगाळ केलेली नाही. त्यांना का भाजप साेडावासा वाटला हे समजत नाही, असे त्यांनी सांगितले.