नागरिकांना सुखी ठेव ; सुधीर मुनगंटीवार यांचे वासवी कन्यका परमेश्वरी मातेला साकडे

Sudhir Mungantiwar-NANDED NEWS

नवीन नांदेड/ प्रतिनिधी: सिडको येथील आर्य वैश्य समाजाचे आराध्यदैवत माता वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराचे भूमीपूजन ते कलशारोहणपर्यंत मला सहभागी होता आले, हे पुण्याईचे फळ असून मातेकडे सत्ता-संपत्ती मागण्यापेक्षा राज्य व राष्ट्राच्या नागरिकांना सुखासाठी प्रार्थना केली , असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सिडको येथील महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या प्रांगणात आर्य वैश्य समाजाचे आराध्यदैवत वासवी कन्यका परमेश्वरी मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर ते भाविकांना संबोधीत करीत होते. कुठलेही राष्ट्र किती धनदांडगे आहे, त्यापेक्षा ते किती सुखी आहे, ह्यावरून त्या राष्ट्राची गुणवत्ता ठरते.

वासवी क्लब सिडको ता.29 बुधवार रोजी हडको येथील बालाजी मंदिरातून वासवी कन्यका परमेश्वरी मातेची भव्य शोभायात्रा वासवी भवना पर्यत काढण्यात आली होती . त्यावेळेस सिडको-हडको आणि परिसरातील आर्य वैश्य समाज , वासवी क्लब इंटरनॅशनल, वासवी क्लब, वनिता क्लब, आर्य वैश्य महासभा नांदेडचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विविध समित्यांचे प्रमुख आणि अन्य समाजातील भक्तभाविक सहभागी होऊन शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करीत होते. या शोभायाञेत महिला ,वारकरी , लेझिम पथक आदिचा सहभाग होता .

वासवी कन्यका परमेश्वरी मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गुरूवर्य भास्कराचार्य महाराज ,ह.भ.प. गुरूवर्य एकनाथ महाराज कंधारकर, ह.भ.प. गुरूवर्य महेश महाराज शेवाळकर, ह.भ.प. महेश महाराज जिंतूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 30 यजमानांच्या सहभागाने तीन दिवस विविध पूजा-अर्चा, यज्ञ संपन्न करण्यात आले. कलशारोहण ह.भ.प. महेश महाराज जिंतूरकर ह्यांच्या हस्ते झाले. मातेची पहिली महाआरती आ. सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंद बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार, व्यवस्थापन समिती प्रमुख अनिल मनाठकर, महासभा उपाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मूर्तीदाता प्रमोद कवटिकवार आदींच्या सहभागाने करण्यात आली. यावेळी आर्य वैश्य समाजाचे महासभाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंद बिडवई, बांधकाम समिती अध्यक्ष भानुदास वट्टमवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी महासभा सहकोषाध्यक्ष डॉ.नरेश रायेवार,अध्यक्ष तुकाराम पातेवार,आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. विजय बंडेवार यांनी तर बिपिन गादेवार यांनी आभार मानले. संपूर्ण देशपातळीवरून आर्य वैश्य समाजबांधव, महिला युवक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.