शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजपा आजही सत्ता स्थापण्यासाठी तयार – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar-Uddhav Thackeray

नांदेड : “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए , सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू.” असं म्हणत भाजपा शिवसेनेसोबत आजही सत्ता स्थापण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले तरीही भाजपा  पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असल्याचं चित्र आहे. ”शिवसेनेने आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए असं आम्ही समजू.” तसंच मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही आणि तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. नांदेडमध्ये एका विवाह सोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.  त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी शिवसेनेवर खोचक टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. “मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यानेच दिल्लीच्या मातोश्री शक्तिशाली झाल्या; शिवाय शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे एकविसाव्या शतकातील आश्चर्य आहे.” असंही ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवरही टीका केला. “व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी या सरकारची परिस्थिती आहे. सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. भिन्न विचाराचं सरकार दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. या सरकारचं भवितव्य काय असेल हे सांगता येत नाही. ” असे मुनगंटीवार म्हणाले.