मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास वाढवणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan Case) विरोधकांनी ठाकरे सरकारला (Thackeray Govt) अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली. राठोडांवर आरोप असताना ते १५ दिवसांसाठी गायब होते. मंगळवारी अचानक शक्तिप्रदर्शन करत राठोड (Sanjay Rathod) यांनी त्यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, “आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेची परीक्षा आहे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अभय द्यायचा की, महाराष्ट्रात पक्षाबद्दल लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे.”

त्याचसोबत संशयाची सुई आपल्या एका मंत्र्यावर आहे. हा संशय दूर होईपर्यंत त्या मंत्र्याला पदावरून दूर करायचे का, हे मुख्यमंत्र्यांना ठरवायचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यात सक्षम आहेत की नाही, हे या प्रकरणावरून दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी ४८ तासांपूर्वी कोरोना रुग्ण वाढतायेत, सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले आणि त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शक्तीप्रदर्शन केले जाते, अपमानाचे प्रदर्शन शिवसेनेचाच मंत्री करतो, मग सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार आहे, असा टोला मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावला.

दरम्यान, अजित पवारांनीही स्वत: आरोपानंतर राजीनामा दिला होता, मंत्रिपदावरून जाणे म्हणजे कायमचे जाणे होत नाही, चौकशी अहवालातून जे काही सत्य येईल, त्यानंतर मंत्रिपद पुन्हा मिळू शकते, राजकीय पक्ष वाईट लोकांचा समूह आहे, ही व्याख्या लोकांच्या मनात निर्माण होत आहे, ज्यादिवशी ही घटना झाली, त्यानंतर ऑडिओ क्लिप्स , फोटो व्हायरल होत आहेत, असे मुनगंटीवारांनी सांगितले आणि या शक्तीप्रदर्शनावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER