सुचित्रा कृष्णमूर्तीचा दावा, करणच्या पार्टीत गेल्यावर काम मिळते

Karan Johar - Suchitra Krishnamoorthi

गेल्या काही दिवसांपासून करण जोहरने (Karan Johar) दिलेल्या एका पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्टीत अनेक मोठमोठे कलाकार दिसत होते. या पार्टीची चौकशी एनसीबी (NCB) करणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युमुळे बॉलिवूड (Bollywood), ड्रग्ज आणि पार्ट्यांवर पोलीस आणि एनसीबीचे लक्ष गेलेले आहे. धर्मा प्रॉडक्शनमध्ये (Dharma Productions) काम केलेल्या क्षितिजलाही एनसीबीने अटक केली आहे. क्वान एजंसीही चौकशीच्या फेऱ्यात आहे. करणच्या पार्टीत गेले तरच पुन्हा काम मिळू शकेल असे एका एजंटने सांगितल्याचा गौप्यस्फोट करीत प्रख्यात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) ने करीत या कंपनीचे खऱे काम समोर आणले आहे.

अभिनेत्री गायिका असलेल्या सुचित्रा कृष्णमूर्तीने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटात काम केले असून गाणीही गायलेली आहेत. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक शेखर कपूरबरोबर सुचित्राने लग्नही केले होते. परंतु नंतर दोघांनी घटस्फोटही घेतला. सुचित्राने आपल्या अनुभवाबाबत बोलताना सांगितले, मला चित्रपटात पुन्हा काम करायचे होते. एका एजंसीच्या एजंटने माझ्याशी संपर्क साधला. त्या एजंटने मला सांगितले, करण जोहरच्या पार्टीला तुम्ही गेलात तरच तुम्हाला काम मिळेल. त्यामुळे तुम्ही करण जोहरच्या पार्टीला जा. केवळ पार्टीतच नव्हे तर वेगळ्या प्रकारच्या गोष्टीही कराव्या लागतील ज्यामुळे तुम्ही पुन्हा लाइमलाइटमध्ये याल असेही त्या एजंट मुलीने सांगितल्याचेही सुचित्रा कृष्णमूर्तीने सांगितले.

गरोदरपणात काम करूनही मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

बॉलिवूडमध्ये एकदा का नायिकेचे लग्न झाले की तिची कारकिर्द संपुष्टात येते. लग्न झालेल्या अभिनेत्रीला पुन्हा नायिका म्हणून निर्माते, दिग्दर्शक संधी देत नाहीत. अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. परंतु एक अभिनेत्री अशी होती तिचे लग्न झाले तरी तिला नायिकेची कामे मिळत. एवढेच नव्हे तर एका चित्रपटाच्या वेळी ती चक्क गरोदर होती. गरोदरपणाततिने चित्रपट पूर्ण केला आणि त्या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. ही नायिका आहे नूतन आणि तो चित्रपट आहे ‘बंदिनी’. केवळ पुरस्कारच नव्हे तर नूतनच्या कारकिर्दीतील हा एक उत्कृष्ट चित्रपट म्हणूनही ओळखला जातो.

नूतने तिच्या कारर्किदीत नायिकाप्रधान चित्रपट जास्त केले. ‘सीमा’, ‘सुजाता’, ‘सोने की चिड़िया’ असे काही चित्रपट नूतनने केले. लग्नानंतर नूतनने ब्रेक घेण्याचा विचार केला. त्याचवेळेस बिमल रॉय यांनी नूतनला ‘बंदिनी’ चित्रपटाची ऑफर दिली. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर नूतनला आवडली पण गरोदर असल्याने चित्रपट करणार नसल्याचा निर्णय घेतल्याने नूतनने चित्रपटाला नकार दिला. तेव्हा नूतनच्या पतीने रजनीश यांनी नूतनला चित्रपटात काम करण्यास तयार केले. पतिने सांगितल्यामुळे नूतनने गरोदर असतानाही चित्रपटाचे शूटिंग केले. चित्रपट पूर्ण झाला आणि प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे नूतनच्या कामाची प्रशंसा झाली आणि पुरस्कारही मिळाला. असा विक्रम आजपर्यंत कोणत्याही नायिकेने केलेला नाही.

लवकरच सुरु होणार अक्षयच्या पृथ्वीराजचे शूटिंग

अक्षय कुमार सध्या स्कॉटलँडमध्ये बेल बॉटम चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. हा चित्रपट आता लवकरच पूर्ण होणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर अक्षय लगेचच यशराजच्या पृथ्वीराजचे शूटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर पृथ्वीराजचे शूटिंग मे-जूनमध्येच केले जाणार होते. फिल्मसिटीमध्ये यासाठी मोठा सेटही लावण्यात आलेला होता. परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शूटिंग होऊ शकले नाही. त्यामुळे तयार केलेला सेटही खराब झाला. परंतु आता सरकारने शूटिंगला परवानगी दिल्याने पृथ्वीराजचे शूटिंग सुरु करण्याची तयारी यशराजने केली आहे. पुढील महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षयच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे. या दोघांची जोडी प्रथमच जमवण्यात आली आहे. पृथ्वीराज एक ऐतिहासिक चित्रपट असून चंद्रप्रकाश द्विवेदी याचे दिग्दर्शन करीत आहेत. अक्षय कुमार, मानुषी छिल्लरसोबत संजय दत्त, सोनू सूदही चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना यशराजने आखली आहे. हा चित्रपट अक्षयच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल असे आतापासूनच बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER