वनिताच्या अशाही ‘ प्युअर’ शुभेच्छा

Such 'pure' wishes from Vanita

समाजाची मानसिकता अजूनही बदलली नसल्याचे अनेक अनुभव समाजातील लोकांना येत असतात. यामध्ये असण्यापेक्षा दिसण्याला अनेकदा महत्त्व दिलं जातं. याचा परिणाम वजनाने जाड असलेल्या, रंगाने काळ्यासावळ्या असलेल्या, उंचीने बुटक्या असलेल्या अनेक लोकांच्या आयुष्यावर होत असतात. यालाच चपराक देण्यासाठी विनोदी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिने न्यूड फोटोसेशन करून बॉडी शेम (Body shame) विरोधात एक पॉझिटिव्ह पाऊल उचलले आहे.

वनिताने कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केलं असून हे फोटोशूट केल्यानंतर वनिताला मराठी सिनेमा नाटक इंडस्ट्रीमधील अनेकांनी कौतुकाच्या कमेंट केल्या आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी वनिताचा हा न्यूड फोटो रिलीज झाला. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना वनिताने एक असाही संदेश दिला आहे की तुमच्या मनातील सौंदर्याच्या व्याख्या जोपर्यंत बदलणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला खऱ्या सौंदर्याची व्याख्या कळणार नाही. वनिताच्या फोटोवरून खरेतर सुरुवातीला खूप संमिश्र चर्चा रंगली. मात्र यामागची वनिताची भूमिका तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर जेव्हा मांडली तेव्हा खरच तिच्या बाजूने अनेक मतं तयार झाली.

कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची भूमिका केलेल्या वनिता खरात हिने हास्य जत्रा मध्ये प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे.

तिच्या न्यूड फोटोबाबत वनिता सांगते, मलाही नेहमी वाटायचं की मला एखाद्या कॅलेंडरच्या फोटोशूटसाठी का बोलावले जात नाही ? आणि मला माहित असायचं त्याचं कारण. मी वजनाने जाड आहे. रंगाने सावळी आहे. सौंदर्याच्या निकषांमध्ये मी कुठेच बसत नाही पण हे झालं समाजातील एका प्रवृत्तीचे मत. आणि या प्रवृत्तीमुळे जाड असलेल्या व्यक्तींमध्ये आपोआप एक न्यूनगंड तयार होत असतो. वयाच्या एका टप्प्यापर्यंत माझ्याही मनात माझ्याबद्दल एक न्यूनगंड होता पण आता मला असं वाटतं की जाड असलेल्या किंवा काळ्यासावळ्या असलेल्या व्यक्तींनी हा न्यूनगंड स्वतः ठेवू नये. मी हे फोटोशूट केलं तोपर्यंत मलादेखील खूप वेगळी भीती वाटत होती. कारण फोटो शूट करत असताना त्या ठिकाणी अनेकजण असणार याची मला कल्पना होती. पण जेव्हा मी या फोटोशूटसाठी तयार झाले तेव्हा मला कुठेही त्यामध्ये अश्लीलता वाटली नाही. शिवाय माझ्या आजूबाजूला माणसं होती जे युनिट होतं त्यांच्या नजरेतही मला कुठे चुकीची भावना दिसली नाही. म्हणजे विवस्त्र असणं हे सगळ्यात प्युअर आहे फक्त आपण त्याकडे कसं पाहतो यावर ते अवलंबून आहे.

वनिताने केलेल्या न्यूड फोटोबाबत तिच्या कुटुंबीयांचे काय मत होतं याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नक्कीच होती. याविषयीदेखील अनेक चाहत्यांनी तिला विचारले की जेव्हा हे फोटोसेशन तिने केलं तेव्हा तिच्या आई बाबांची, भावाची प्रतिक्रिया काय होती ?यावर वनिताने दिलेले उत्तर देखील तितकच महत्त्वाचे आहे. फोटोशूट केल्यानंतर तिने आईला सांगितलं की मी न्यूड फोटोसेशन केले आहे. खरेतर सुरुवातीला तिच्या आईला न्यूड या शब्दाचा अर्थ कळला नाही आणि तिने जेव्हा त्याचा अर्थ सांगितला तेव्हा तिची आई म्हणाली की हो, ठीक आहे. तुझं काम असेल आणि त्या कामातून तू काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत असशील तर त्या फोटोमध्ये मलादेखील कुठलीही चुकीची गोष्ट दिसत नाही. आणि वनिताचा भाऊ आणि वडिलांनीही तिला सपोर्ट केला. म्हणूनच वनिता म्हणते, माझे आई-बाबा भाऊ माझ्या विचारांना पाठबळ देणारे आहेत तर मग जगात कुणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. यापूर्वी न्यूड नावाच्या एका सिनेमावरून समाजामध्ये फार मोठा गदारोळ उठला होता. तसेच जेव्हा अनेक चित्रकार न्यूड महिलांचे चित्र काढतात तेव्हा देखील त्यांच्यावर नेहमीच टीकास्त्र सोडले जाते. याकडे देखील वनिताने लक्ष वेधले असून मानसिकता बदलली तरच दृष्टिकोन बदलेल असा संदेशही तिने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER