भरत जाधवचा असाही पुढाकार

Bharat Jadhav - Maharashtra Today
Bharat Jadhav - Maharashtra Today

कलाकार नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो, व्हिडीओ किंवा नव्या सिनेमा व मालिकांचे प्रमोशन करत लोकप्रियता मिळवत असतात असं बोलून ट्रोलिंग करणाऱ्यांना गेल्या काही दिवसांत कलाकारांनीही चोख उत्तर दिले आहे. सध्याच्या कोरोना संकटाचा फटका कलाकारांनाही बसला आहे; पण त्यातूनही कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत. कलाकार त्यांच्या लाखोच्या घरात असलेल्या फॉलोअर्सपर्यंत मदतीचे आवाहनही करत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या खिशातून हातात काहीच काम नसलेल्या पडद्यामागच्या तंत्रज्ञांनाही मदत देत आहेत. पडद्यावर विनोदी अभिनेता अशी ओळख असली तरी प्रत्यक्षात अत्यंत संवेदनशील व्यक्ती असलेल्या अभिनेता भरत जाधव यानेही असाच मदतीसाठी पुढाकार घेतल्याने कोरोना रुग्णांची सोय झाली आहे. भरतने त्याच्या इन्स्टापेजवर ही गोष्ट शेअर करत तुम्हीही अशा प्रकारे मदत करू शकता, असे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक कलाकारांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. शूटिंगच्या निमित्ताने प्रवासात असलेल्या कलाकारांना तर कोरोनामुळे होमक्वारंटाईन व्हावे लागले होतेच; पण अनेक कलाकारांच्या कॉलनी, इमारतीतही रुग्ण आढळल्याने कलाकारांनी ही परिस्थिती जवळून पाहिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अभिनेता उमेश कामत, अभिनेत्री प्रिया बापट, आशय कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, संजय मोने यांना कोरोना झाला. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलसकर यांचाही मृत्यू कोरोनाने झाला. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर झालं. याच कालावधीत अभिनेता भरत जाधव याच्या इमारतीत चार रुग्ण आढळले. त्या चार रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी भरतने जे पाऊल उचलले त्यासाठी त्याचे कौतुक होत आहे.

भरतने याबाबत पोस्ट लिहिली आहे. तो या पोस्टमध्ये असे लिहितोय की, आमच्या इमारतीत चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्या सगळ्यांचा फ्लॅट वन बीएचके असल्याने त्यांच्यासाठी घरातच स्वतंत्र खोली असली तरी टॉयलेट बाथरूम स्वतंत्र नव्हते. शिवाय घरातील इतर निगेव्हिट असलेल्या सदस्यांनाही संसर्गाचा धोका होता. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती. जेव्हा ही गोष्ट माझ्या कानावर आली तेव्हा मी आमच्या इमारतीतील जे फ्लॅट रिकामे होते त्यांच्या मालकांशी संपर्क साधला आणि ते या चार रुग्णांसाठी कोरोना क्वारंटाईन कक्ष म्हणून द्यावेत, अशी विनंती केली. सुरुवातीला ते तयार नव्हते; पण परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर ते तयार झाले. त्यामुळे रुग्णांची सोय इमारतीतच झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचीही काळजी मिटली. ज्यांनी रिकामे फ्लॅट या कामासाठी दिले त्यांची सहा महिन्यांची मेंटेंनन्स फी माफ केली. अनेकदा इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतले जातात. असे अनेक फ्लॅट सध्या रिकामे आहेत. ते फ्लॅट जर क्वारंटाईन होण्यासाठी खुले केले तर अनेकांची सोय होईल.

भरतच्या या पुढाकाराने त्याच्या इमारतीतील चार रुग्णांना सुरक्षित क्वारंटाईन कक्ष मिळाला व उपचार झाले. भरतच्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला आहे. भरत नेहमीच अशा प्रकारे मदत करत असतो. सध्या तो ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका करत आहे. पण केवळ मालिकेत सुखी माणसाची व्याख्या सांगण्याबरोबरच भरतची प्रत्यक्ष आयुष्यातील ही सुखी माणसाची कृती कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button