विराजसची अशीही अनोखी मदत

Virajas Kulkarni

आपल्यामुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद फुलत असेल… आपल्या कलेमुळे कुणाचे काही क्षण का असेना विरंगुळा, मनोरंजन होणार असेल तर? आयुष्यात असा एक तरी क्षण यावा असे प्रत्येकाला वाटत असते. आणि आपल्यामुळे त्यांचे दु:ख विसरणारे रसिक कॅन्सरग्रस्त बालरुग्ण असतील तर यातून मिळणाऱ्या समाधानाला, आनंदाला कशातच मोजता येणार नाही. अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याने नुकताच हा अनुभव घेतला आणि कधी तरी आवडीखातर शिकलेली जादूची कला दाखवून आपण कॅन्सरग्रस्त बालकांसाठी आनंददूत बनलो या आनंदाने विरासजला आकाशही ठेंगणे झाले आहे.

कॅन्सर पेशंट एड असोसिएशन अर्थात सीपीएए (CPA)या संस्थेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. अगदी लहान वयातच कॅन्सर झालेल्या या मुलांच्या आयुष्याचा आलेख किती आहे हे माहिती नाही. कुणी सहा महिने तर कुणी जेमतेम वर्ष दोन वर्षेच जगणार असेल. पण जितके दिवस त्यांचे आहेत त्यामध्ये त्यांचे बालपण फुलावे यासाठी ही संस्था त्यांच्या मनोरंजनासाठी, आनंदासाठी काम करते. गेल्या आठवड्यात जागतिक कॅन्सर रोझ डे साजरा झाला. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढणाऱ्या या चिमुकल्यांना हसता-बागडता यावं, मनमोकळेपणाने आनंदित होता यावे हाच यामागचा हेतू. यानिमित्ताने संस्थेने विराजसच्या जादूगिरीचा कार्यक्रम ठेवला. सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर अर्थातच हा सगळा प्रपंच ऑनलाईन होता. विराजसला जेव्हा संस्थेकडून हे निमंत्रण दिले तेव्हा त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय विराजसने खास त्याच्या आवडीचे, लहान मुलांना आवडतील असे जादूचे प्रयोग निवडले, त्याची पूर्वतयारी केली आणि दोन तास ही सगळी कॅन्सरग्रस्त मुलं त्यांच्या वेदना, दु:ख विसरून जादूच्या नगरीत हरवून गेली. विराजस सांगतो, माझ्या आजवरच्या जादूच्या प्रयोगांमध्ये हा प्रयोग माझ्यासाठी खूप मोलाचा होता. माझ्या हातची जादू बघणाऱ्या मुलांपैकी कुणी हॉस्पिटलच्या बेडवर पडून होतं, तर कुणी कॅन्सर केंद्रातल्या एका कोपऱ्यात बसून होतं. मला ही मुलं प्रत्यक्ष दिसत नसली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जाणवत होता.

अनेक कलाकार हे पडद्यावर अभिनय करत असले तरी त्यांचे काही छंदही असतात. कुणी पट्टीचा गायक असतो तर कुणी रंगरेषांमध्ये रमणारा चित्रकार. सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून आदित्य कश्यप म्हणून घराघरांत पोहचलेला विराजस कुलकर्णी हा पडद्यामागे एक जादूगार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा, एक लेखक याबरोबरच छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय, असंख्य मुलींचा फॅनफॉलोअर या नोटवरही विराजस सध्या हिट आहे. त्याच्या जादूगिरीचा अनुभव मालिकेच्या सेटवरील मोकळ्या वेळेत त्याच्या सहकलाकारांनी घेतला आहे. त्याची ऑनस्क्रीन नायिका गौतमी देशपांडे हिनेही त्याच्या जादूकलेचे भरभरून कौतुक केले आहे.

विराजस हा मूळचा पुण्याचा. पुणेकर असल्याने सतत काही तरी नवीन शिकण्याची हौस त्यालाही होती. दहावीत असताना विराजसला शाळेतच नाटक हा विषय अभ्यासाला होता. त्यामुळे शालेय वयात इंटरस्कूल नाट्यस्पर्धा गाजवण्यात तो तरबेज झाला. त्याच्या अभिनेता होण्यात हे बाळकडू नक्कीच आहे. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मग ही जादूची कला त्याने कधी शिकून घेतली? विराजसच्या घरात अभिनय, वाचन, साहित्य याला जितकं महत्त्व तितकंच अभ्यासालाही. त्यामुळे नववीपर्यंत सुरू असलेलं नाटकवेड दहावीत अभ्यासामुळे कमी करायला सांगितलं गेलं. दहावीत अभ्यास सुरू होता पण नाटकाला ब्रेक लागल्यामुळे जी काही एनर्जी अंगात होती तिचं काय करायचं हा प्रश्न विराजसला स्वस्थ बसू देईना. मग काय, अभ्यासातून जरा मोकळा वेळ मिळाला की विराजस इंटरनेटवर जादूचे प्रयोग पाहात बसायचा. पाय मोकळे करायला बाहेर गेल्यावर जादू कशी करायची याची छोटी पुस्तके त्याने आणली. एकीकडे दहावीचा अभ्यास आणि दुसरीकडे जादूच्या प्रयोगाची स्वतःचीच शिकवणी असा दुहेरी उद्योग विराजस करत होता. दहावीच्या परीक्षेनंतर जेव्हा विराजस मावशीकडे लंडनला सुटीसाठी गेला तेव्हा त्याचे जादूचे वेड बघून मावशीनेही त्याला काही जादूप्रयोगाच्या सीडीज दिल्या. मग काय, स्वारी खूश. विराजसने निरीक्षण, सराव यातून जादूचे प्रयोग शिकून घेतले. त्यानंतर घरी कुणी पाहुणा आला किंवा फॅमिली फंक्शनमध्ये मुलांनी काही तरी कला सादर करावी असे ठरले की, विराजसची जादूगिरी अगदी ठरलेली असायची. पुढे त्याने दीड तासाचे छोटे जादूचे प्रयोगही सेट केले. अगदी कॉलेज संपेपर्यंत विराजसच्या पॉकेटमनीची सोयदेखील त्याच्या या कलेने केली होती.

आजवर त्याने अनेकांच्या आग्रहाखातर जादूकला दाखवली. कोणत्याही वयातील व्यक्तीला जादू बघायला आवडते; पण मोठी माणसं जादू बघताना त्यातील हातसफाई शोधत असतात. लहान मुले मात्र निरागसपणे आनंद घेत निखळपणे जादू बघतात. विराजस सांगतो, कॅन्सरग्रस्त मुलांसाठी जादूचे प्रयोग दाखवणं माझ्यासाठी पहिल्यांदाच होत होतं. माझ्या आजोबांना कॅन्सर होता. त्यामुळे मला कॅन्सरग्रस्तांना असलेली आयुष्याची किंमत माहिती आहे. माझी आईदेखील कॅन्सरग्रस्तांसाठी काम करत असल्याने मलाही जाणीव आहे. माझ्या जादूकलेच्या निमित्ताने मीदेखील या सामाजिक कामाशी जोडला गेलो याचा मला खूप आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER