कॉमेडीचा असाही पंच

Makrand Anaspure

विनोदी अभिनेता रिअल आयुष्यातदेखील अनेक विनोदी पंच ( Comedy Punch) मारत असतो. वेगवेगळ्या कोपरखळ्या, शाब्दिक चकमकी करतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांना नेहमीच हसवत ठेवत असतो. विनोदाचे अचूक टायमिंग पडद्यावर साधणारे विनोदवीर हे खऱ्या आयुष्यात जेव्हा एखाद्या विनोदी प्रसंगाला सामोरे जातात तेव्हा स्वतःवर हसण्याची खिलाडूवृत्ती त्यांच्यामध्ये नक्कीच असते. असाच प्रसंग घडला विनोदाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकरंद अनासपुरे यांच्याबाबत. आजही जेव्हा जेव्हा विनोद कसा सुचतो असा मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा हा किस्सा सांगितल्याशिवाय मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांना राहावत नाही.

एकदा हैदराबादला चित्रीकरणाच्या निमित्ताने जाण्याची वेळ आली. हैदराबादचा प्रवास हा विमान प्रवास होता. मकरंद यांच्या आयुष्यातील हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे तेदेखील या प्रवासाविषयी खूप उत्सुक होते. प्रवासापेक्षा पहिल्यांदाच विमानात बसण्याचा एक वेगळाच आनंद त्यांना झाला होता. खरं तर मकरंद अनासपुरे हे मराठवाड्यातील एका छोट्या गावातून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची बोलीभाषा, राहणीमान अजूनही गावाकडच्या नाळेशी जोडलेली आहे. आणि त्याचा नेहमी त्यांना सार्थ अभिमान वाटत आला आहे.

बोलीतून जेव्हा विनोदाची पेरणी होते आणि त्यातून प्रेक्षकांना हसवण्याचा आनंद मिळतो तो माझ्यासाठी लाखमोलाचा असल्याचे मकरंद नेहमी सांगतात. अभिनयाच्या माध्यमातून खळखळून हसवणाऱ्या मकरंद यांनी आयुष्यातला पहिला लाफ्टर कधी काढला असं जेव्हा त्यांना चाहत्यांनी विचारलं तेव्हा ते थेट त्यांच्या शालेय वयात पोहचले. एका नाटकात त्यांची पॅन्ट मोठी होती. त्यामुळे संवाद बोलता बोलता त्यांचा एक हात पँटवर ओढण्यासाठी जायचा. समोरच्या प्रेक्षकांना हे विनोदी वाटले आणि तेव्हा प्रेक्षक आधी हसायचे आणि मग त्याच्या संवादाकडे कान लावायचे. मकरंद सांगतात, मला वाटलं होतं पुढे जाऊन त्यांना हशा नेमका कशासाठी येत होता ते कळलं .

हैदराबाद प्रवासाच्या निमित्ताने मकरंदचे विमान उडाले आणि त्यापूर्वी एअर होस्टेसने आपापले सीट बेल्ट बांधून घ्या, अशी सूचना केली. त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर अभिनेता समीर धर्माधिकारी सहप्रवासी होता. समीर आणि मी एकत्र बसलेले बघून खरं तर ती एअर होस्टेस बुचकळ्यात पडली होती, असे सांगतानादेखील विनोद करण्याची हौस काही सुटली नाही. त्यावेळी मकरंद म्हणाला होता, तुमचा कितीही विश्वास बसत नसला तरी समीर आणि मी सहप्रवासी आहोत आणि आम्ही मित्रही आहोत.  मकरंद अनासपुरे यांना नेहमी वाटत राहतं की समीर म्हणजे जन्मापासूनच फाडफाड इंग्रजी बोलत असावा की काय इतका तो टकाटक दिसतो. आणि त्याच्या तुलनेत मी मात्र तसा गावाकडनं  आलेला थोडासा रांगडी. त्यामुळे कदाचित एअर होस्टेसला असं वाटलं असेल.

सूचना ऐकून मकरंदने बेल्ट बांधायला घेतला पण काही केल्या ते सीटबेल्ट लॉक लागेना. पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. खरं सांगतो की तो प्रसंग इतका बाका होता की मी आधी बेल्ट बांधावा म्हणून समीर शांत बसला होता आणि एअर होस्टेस आमच्याकडे बघत होती. मी दोन्ही टोके एकत्र केली पण माझ्याच्याने काही ते लॉक लागेना. विमानात बसण्याचा पहिला अनुभव असल्यामुळे सीटबेल्ट बांधण्याचा तरी अनुभव कसा असणार.बराच वेळ गेला तरी मी आपल्या लॉक लावतोय पण ते काही बसेना. समीरने माझ्याकडे पाहिलं आणि काय करतोय ते त्याच्या लक्षात आलं. सगळ गणित कळलं होतं कारण मी माझा बेल्ट आणि समीरचा बेल्ट एकत्र रित्या लॉक करत होतो. त्यामुळे हे लॉक आयुष्यभर या विमानात बसलो असतो तरी लागलं नसतं. माझ्या वेंधळेपणामध्ये समीरने मला सांभाळून घेतलं आणि त्याने आपल्या बेल्ट बाजूला घेतला आणि मला माझा बेल्ट कुठे आहेत हे दाखवून शेवटी एकदाचा लागला. आणि आम्ही हुश्श केलं. त्यानंतर अनेकदा चित्रीकरणाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विमानाने प्रवास केला मात्र ही विमानातली आठवण मला आजही आठवते आणि मला स्वतःला देखील हसू आल्याशिवाय राहत नाही.

नाटकांमधून मकरंद अनासपुरे याला सिनेमांमध्ये अभिनय करण्याचे स्वप्न खुणावत होते आणि त्याने पाचशे रुपये खिशात घेऊन मुंबई गाठली. सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करून त्याने अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेता त्याबरोबरच मकरंद सामाजिक जाणीव आणि संवेदना असलेला माणूस म्हणून देखील इंडस्ट्रीमध्ये परिचित आहे . अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत मकरंदने सुरू केलेली नाम ही संस्था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी काम करते. या संस्थेच्या माध्यमातून मकरंदने अनासपुरे अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत. खळखळून हसवणारा कलाकार पडद्यावर विनोदी अभिनेता म्हणून जरी ओळखला जात असला तरी प्रत्यक्ष जीवनात कुणाच्याही दुःखाने व्यथित होणारा हा संवेदनशील माणूस आहे.

ही बातमी पण वाचा : आता मला पम्मी म्हणायचं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER